श्रीकृष्ण जन्मोत्सव: ‘या’ शुभ मुहूर्तावर करा बाळकृष्णाचे पूजन; जयंती योग कधी? पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:45 AM2024-08-23T08:45:37+5:302024-08-23T08:48:28+5:30
Shravan Shri Krishna Janmashtami Janmotsav 2024: यंदा श्रीकृष्ण जन्मोत्सवात बाळकृष्णाचे पूजन कधी करावे? जाणून घ्या...
Shravan Shri Krishna Janmashtami Janmotsav 2024: श्रावणात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. यापैकी श्रीकृष्ण जयंती, कृष्ण जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यंदा २०२४ मध्ये २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. बाळकृष्णाच्या पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? जयंती योग कधी आहे? जाणून घेऊया...
बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात.
जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा शुभ योग कधी?
यंदाच्या वर्षी जन्माष्टमी, अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत-महंत, तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची पूजा करू शकतील. सोमवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू असून, २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी अष्टमी समाप्त होईल. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी ०३ वाजून ५५ मिनिटांपासून सुरू होईल आणि २७ ऑगस्ट रोजी दुपारी ०३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत राहील. जयंती योगात जन्माष्टमीचे व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
जन्माष्टमीला पूजनाचा शुभ मुहूर्त
- अमृत चौघडिया मुहूर्त पहाटे ०५ वाजून ५६ मिनिटांपासून ते ०७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.
- निशीथकाळ शुभ मुहूर्त रात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत.
जयंती योगाचा शुभ संयोग
या दिवशी चंद्र वृषभ राशीत असणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीही असाच योगायोग होता. अष्टमी तिथी मध्यरात्री येते त्या रात्री जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्राची उपस्थिती खूप शुभ ठरू शकणारी आहे. जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर तो अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो. बुधवार आणि सोमवारी जन्माष्टमी येते तेव्हा जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो. ज्याला जयंती योग असेही म्हणतात.