Shravan Shukravar Vrat 2022: जिवतीच्या व्रताने करा श्रावण मासारंभ; मुलांच्या दीर्घायायुष्याचे घ्या वरदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:46 PM2022-07-26T17:46:36+5:302022-07-26T17:49:12+5:30
Shravan Shukravar Vrat 2022: हे व्रत स्त्रीत्त्वाचे, मातृत्त्वाचे, वात्सल्याचे गौरव करणारे व्रत आहे. आपणही त्याचा एक भाग होऊया आणि श्रावणाचे स्वागत करूया!
यंदा २९ जुलै रोजी शुक्रवारी जिवतीच्या व्रताने श्रावण मासाची सुरुवात होत आहे. श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि त्यानुसार व्रताचरण धर्मशास्त्राने आखून दिले आहे. त्यात खूप काही तयारीची गरज नसते. रोजचेच घरातले जिन्नस, भोळा भाव आणि देवपूजा यापलीकडे विशेष काहीही तयारी अभिप्रेत नसते. परंतु या व्रतांमुळे केलेले धर्माचरण मनाला दीर्घकाळ प्रसन्नता देणारे ठरते. हे आपण आपल्या आई आजींकडून अनुभवले आहे. फार ओढाताण न करता आपणही शक्य तेवढा हा संस्कृतीचा वसा जपण्याचा आणि पुढे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करू जिवतीच्या व्रताने!
जिवतीचे पूजन का केले जाते, तिच्या कागदावरील चित्राचा अर्थ काय हे सांगणारा लेख आपण या आधी दिला आहे. सोबत त्या लेखाची लिंक जोडत आहोत. ती माहिती वाचली असता, पूजेचा उद्देश स्पष्ट होईल आणि जिवती मातेची श्रावणातील चारही शुक्रवारी मनोभावे पूजा करता येईल.
या व्रताचा विधी साधारण पुढीप्रमाणे आहे -
श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी बायकांनी हळद कुंकू देऊन दूध, साखर व फुटाणे प्रसाद म्हणून देतात. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालतात. एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालतात व तिला पुरणपोळीचे भोजन वाढून दक्षिणा देतात.
जिवतीचे (Jivati Puja 2022) चित्र लावून गंध, हळदकुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात आणि ज्यायोगे देहधारणा होते त्या प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पंचप्राणांची प्रतीके म्हणून पुरणाच्या पाच दिव्यांची तिची आरती करतात.
मानवी देहाला अन्नमय, मनोमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय, कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक, शिशू, बाल, पौगंड, तरुण, प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत. जीवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळे ही त्या अवस्थांची प्रतीके आहेत.
जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात. त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण करावे. मुले परगावी असतील तर चारी दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या आणि `हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर' अशी प्रार्थना केली जाते.
जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते. पीतवर्ण या विकारांचे प्रतीक मानण्यात येतो म्हणून जीवंतिका व्रत करणाऱ्या महिलांनी त्या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करू नये.
श्रावणी शुक्रवारी (Shravan Shukravar Vrat 2022) कापसाची वस्त्रे हळद कुंकू लावून जिवंतीकेला अर्पण करावी. देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवावा. त्यानिमित्ताने देवी स्वरूपात सुवासिनीचा पाहुणचार करून तिच्या मुला बाळांना भेटवस्तू देऊन जिवतीचा सन्मान करावा. अशा रितीने जिवंतिकेची मनोभावे ही पूजा करून देवीची कृपा प्राप्त करावी.
हे व्रत स्त्रीत्त्वाचे, मातृत्त्वाचे, वात्सल्याचे गौरव करणारे व्रत आहे. आपणही त्याचा एक भाग होऊया.