Shravan Shukrawar 2023: निरोगी आयुष्याचे वरदान देणाऱ्या वरदलक्ष्मीला दाखवा पौष्टिक हयग्रीवाचा नैवेद्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 07:00 AM2023-08-25T07:00:00+5:302023-08-25T07:00:02+5:30
Varad Laxmi vrat 2023: आज श्रावणी शुक्रवार आणि जिवतीचे तसेच वरद लक्ष्मीचे व्रत; त्यानिमित्ताने पुरणापासून बनणारा हा दक्षिणेकडचा नैवेद्य बनवून बघा!
महाराष्ट्रात संपूर्ण श्रावणमासात आणि विशेषतः श्रावण शुक्रवारी जसे जिवतीपूजन केले जाते, तसे दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात आपल्याकडे देखील वरद लक्ष्मीची पूजा केली जाते. वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात.
या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे.
या दिवशी देवीची पूजा करून वरद लक्ष्मीची कथा वाचावी आणि देवीला नैवेद्यात पुरणावरणाचा नैवेद्य दाखवावा. आजच्या दिवशी दक्षिणेत हयग्रीवाचा नैवेद्य दाखवतला जातो. हे खास कर्नाटकी पक्वान्न आहे. घोड्याचे मुख असलेले हयग्रीव स्वामी म्हणजे विष्णूचा अवतार मानतात.त्यांचा आवडता नैवेद्य हयग्रीव!
हयग्रीव करण्याची पद्धत -
- एक वाटी चणाडाळ स्वच्छ धुवून तिप्पट पाणी घालून शिजवून घ्यावी.
- डाळ शिजायला हवी पण मोडायला नको.
- जास्तीचे पाणी काढून एक वाटी गूळ घालून पुन्हा गॅसवर ठेवावी. थोडीशी घोटून घ्यावी.
- वेलचीपूड, खवलेले ओले खोबरे घालावे.
- तूपात बेदाणे आणि काजू तळून घालावे.
- या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि दक्षिणेकडील पदार्थाची ओळख मिळण्यासाठी चिमूटभर भीमसेनी कापूर टाकावा आणि एक दणदणीत वाफ काढावी.