Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 07:00 AM2023-08-18T07:00:00+5:302023-08-18T07:00:02+5:30

Shravan Shukrawar 2023: कणिक आणि मैदा समप्रमाणात वापरून केलेली पुरणपोळी अधिक लुसलुशीत होते आणि कटाच्या आमटी बरोबर उत्तम लागते; वाचा दोन्ही रेसेपी!

Shravan Shukrawar 2023: On Shravan Friday offering Jivati Puranpoli and spicy puran dal! | Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य!

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य!

googlenewsNext

श्रावण मास सुरू होताच नैवेद्याची सिद्धी होऊ लागते. जशा आपल्या आवडी निवडी असतात, तशा देवाच्याही आवडी निवडी आपण जपण्याचा प्रयत्न करतो. श्रावण शुक्रवारी जिवतीच्या पूजेचे महत्त्व असते. तिच्या स्वागतासाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कटाच्या आमटीचा बेत केला तर या दिवसाची गोडी अधिकच वाढेल. पुरण केल्यावर तळण ओघाने आलेच. त्यासाठी आपण पापड, कुरडाया, भजीची जोड देऊ शकता. मात्र त्याबरोबर पुरणाचे पातेले रिकामे झाले की त्याला लगडलेल्या चमचाभर पुराणातून कटाची चविष्ट आमटी कशी बनवायची तेही जाणून घेऊ. या दोन्ही रेसेपी वैदेही भावे यांच्या चकली ब्लॉगस्पॉटवरून आपण फॉलो करत आहोत. 

पुरणपोळी 

साहित्य:
१ कप चणाडाळ
१ कप किसलेला गूळ
एक कप मैदा
१/२ कप गव्हाचे पिठ
७ ते ८ टेस्पून तेल
१ टिस्पून वेलचीपूड
कोरडे तांदुळाचे पीठ

कृती:
१) चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.
३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे.
४) मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.
५) पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
६) पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.

टीप:
१) वेलचीऐवजी  जायफळपूड वापरू शकतो. त्याचा स्वादही चांगला येतो.

कटाची आमटी 

साहित्य:
१/४ कप चणाडाळ (महत्त्वाची टीप १)
::::ताजा कुटलेला मसाला::::
१ टेस्पून सुक्या खोबर्‍याचा किस,
१/२ टिस्पून जिरे,
१ ते २ काळी मिरी,
१ ते २ लवंगा,
१ लहान तमालपत्र, आणि
अगदी छोटा दालचिनीचा तुकडा (टीप २).
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१ टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टेस्पून गूळ
१ टेस्पून ओला खवलेला नारळ
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:
१) चणाडाळ कूकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावी.
२) खोबर्‍याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्यावे. खलबत्त्यात कुटून त्याची पूड करावी.
३) चणाडाळ व्यवस्थित घोटून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळ फोडणीस घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.
४) आमटीला उकळी फुटली कि कुटलेला मसाला चमचाभर घालावा आणि गोडा मसाला घालावा. ढवळून चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. चवीपुरते मिठ घालावे. आमटी घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवावे.
५) एका उकळीनंतर आमटीची चव पाहावी गरज वाटल्यास कुटलेला मसाला घालून थोडावेळ उकळावे.
६) ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनीट मंद आचेवर उकळावी.
हि आमटी पुरणपोळी खाताना तोंडी लावणी म्हणून घेतात तसेच गरमागरम तूपभातावर हि आमटी अप्रतिम लागते.
तसेच हि आमटी आदल्या दिवशी करून दुसर्‍या दिवशी खाल्ली तर छान मुरते आणि अजून चविष्ट लागते.

टीप:
१) हि आमटी बर्‍याचदा पुरणपोळी केली कि करतात. जर तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर चणाडाळ शिजवताना थोडे जास्त पाणी घालून डाळ शिजवावी. पाणी वाडग्यात निथळून घ्यावे. जर निथळलेले पाणी १ कप असेल तर १/२ कप शिजवलेली डाळ बाजूला काढावी आणि वर दिलेल्या कृतीनुसार (स्टेप २ पासून) आमटी करावी.
२) दालचिनीच्या तुकड्याऐवजी दालचिनीची पूड मिळते तीसुद्धा वापरली तरी चालेल, ती न भाजता थेट आमटीत घालावी.चिमूटभरच वापरावी.
३) ताजा कुटलेला मसाला वापरल्याने चव अप्रतिम येते. थोडी मेहनत पडली तरी ताजा मसाला वापरल्याने चवीत खुपच फरक पडतो. जर हा मसाला वापरायचा नसेल तर १ टिस्पून ऐवजी २ टिस्पून गोडा मसाला वापरावा.
४) बरेचजण वेगळ्या पद्धतीने हि आमटी बनवतात. घोटलेली डाळ पाणी घालून सारखी करावी त्यात गूळ, चिंच कोळ, फ्रेश कुटलेला मसाला, गोडा मसाला, मीठ, खवलेला नारळ असे एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावी. छोट्या कढल्यात फोडणी करून ती वरून घालावी आणि अजून थोडावेळ उकळी काढावी.
५) काहीजणांना या आमटीत कांद्याची चव आवडते, अशावेळी फोडणीत बारीक चिरलेला कांदा (१/२ कप) घालून परतावे.

Web Title: Shravan Shukrawar 2023: On Shravan Friday offering Jivati Puranpoli and spicy puran dal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.