Shravan Somvar 2021 vrat : विशेषतः श्रावणी सोमवारीच उपास का करतात? वाचा त्यामागील रोचक कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:44 PM2021-08-03T16:44:22+5:302021-08-03T16:47:38+5:30
Shravan Somvar 2021 vrat : सोमवारचा उपास दुपारी सोडता येत नाही. तो सूर्यास्तानंतरच सोडावा लागतो. शिवभक्तांकडे हा कुळाचार आहे.
श्रावणी सोमवारची बालपणापासून मनात जपलेली आठवण म्हणजे, त्या दिवशी शाळेला मिळणारी अर्धी सुटी, दिवसभर फलाहार खाऊन केलेला उपास आणि सायंकाळी सातच्या आत केळीच्या पानावर घेतलेला सुग्रास भोजनाचा आस्वाद! आजही या आठवणी मनात रुंजी घालतात. परंतु, तेव्हा कधी पडला नाही, तो प्रश्न आता पडतो, तो म्हणजे श्रावणाच्या सोमवारीच उपासाला विशेष महत्त्व का? हे आहे त्याचे कारण...
आपल्याकडे सातही वार हे कुणा ना कुणा देवाचे म्हणून मानण्यात आले आहेत. रविवार-सूर्याचा, खंडोबाचा, सोमवार- शंकराचा, मंगळवार-गणपती आणि देवीचा, बुधवार-पांडुरंगाचा, गुरुवार-दत्तात्रेयांचा, शुक्रवार-बालाजी आणि लक्ष्मीचा, शनिवार-शनि आणि मारुतीचा हे वार आणि त्यांची दैवते आहेत.
यातील विशेषत: सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी त्या त्या देवतांचे उपासक हा उपास करतात. तो एकादशीप्रमाणे दोन वेळचा नसतो. तर दुपारी जेवून रात्री उपास केला जातो. याला दुपारीच उपास सोडणे असे म्हणतात. परंतु असे करण्याला सोमवार अपवाद आहे. सोमवारचा उपास दुपारी सोडता येत नाही. तो सूर्यास्तानंतरच सोडावा लागतो. शिवभक्तांकडे हा कुळाचार आहे. सोमवारी सायंकाळी ते शंकराला दही भाताचा नैवेद्य अर्पण करतात आणि मगच उपास सोडतात.
अलीकडे असा सोमवारचा उपास करणारी मंडळी कमी झालेली असली, तरी श्रावणी सोमवारचा उपास करणारी मंडळी अनेक आहेत. तोही कुळाचार असतो. हा उपास स्त्री-पुरुष दोघेही करतात व दिवसभर उपास करून सूर्यास्तानंतर उपास सोडतात.
या श्रावणी सोमवारची एक कथा आहे-
एका गावात एक शिवालय होते. त्याचा गाभारा दुधाने भरून शंकराची पूजा करावी असे तेथील राजाच्या मनात आले. गावातील सर्व लोकांनी घरी एक थेंबभरही दूध न वापरता ते गाभाऱ्यात आणून ओतावे आणि याप्रमाणे जो वागणार नाही त्याला कठोर शासन करण्यात येईल अशी त्याने दवंडी पिटवली.सर्व गावकरी घाबरले. त्यांनी आपल्या लेकरा बाळांना दुधाचा थेंब न देता शंकराच्या गाभाऱ्यात आणून दूध ओतले. तरीही गाभारा दूधाने भरला नाही. राजा चिंतेत पडला.
सायंकाळी एक बाई भक्तीभावाने एका छोट्या वाटीत दूध व तबकात बेल व धोतऱ्याची फुले, कापूर, उदबतती, गंध, भस्त असे साहित्य घेऊन तिथे आली. तिने मनोभावे प्रथम पूजा केली आणि वाटीतील दूध गाभाऱ्यात ओतले. तोच हळूहळू गाभारा दूधाने भरू लागला आणि थोड्या वेळातच तो पूर्णपणे दुधाने भरून वाहू लागला.
राजाला हकीकत कळली. तो धावत तिथे आला. त्याने त्या बाईला विचारलं, तेव्हा ती म्हणाली, 'राजन, माझ्या घरी नातवंडे लहान आहेत, घरात आणखी म्हातारी माणसे आहेत. त्यांनाही दूध लागते. लहान मुले आणि म्हातारी माणसे यांना उपाशी ठेवून गाभाऱ्यात दूध ओतणे मला पटले नाही. देवाने तसे कुठेही सांगितले नाही. मी छोट्या वाटीतून दूध आणून देवाला भक्तीभावाने वाहिले. देव भावाचा भुकेला असतो. त्याच्यापर्यंत माझी सेवा नक्कीच पोहोचली असेल. तुझ्या दवंडीप्रमाणे मी वागले नाही, तुला जी शिक्षा करायची ती कर! मी आनंदाने भोगीन. '
हे ऐकून राजा मनोमन खजील झाला. त्याने तिला वंदन केले. मग ती बाई घरी आली. तिच्या घरातील सर्व कुटुंबीयांना शिवकृपेने दीर्घायुष्य लाभले. तो प्रसंग घडला, तो दिवश श्रावणी सोमवारचा होता. तिने त्या दिवसापासून श्रावणी सोमवारच्या उपासाचे व्रत घेतले व तेच व्रत सर्व शिवभक्तांमध्ये रूढ झाले. पुढेपुढे हा कुळाचार बनला.