Shravan Somvar 2024: श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये; त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 09:17 AM2024-07-29T09:17:59+5:302024-07-29T09:19:20+5:30
Shravan Somvar 2024: स्त्रियांनी केस कधी धुवायचे यावर शास्त्राचं बंधन का? हे सगळे नियम स्त्रियांवरच का? मग योग्य दिवस कोणता? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
सोमवार महादेवाचा, हे आपण बालपणापासून शिकत आलो आहोत. महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टीदेखील सोमवारी आपण अर्पण करतो, पण अप्रिय गोष्टींचे कोणत्या आणि त्या का टाळायला हव्यात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!
येत्या ५ ऑगस्ट पासून श्रावण (Shravan 2024) सुरु होत आहे आणि सुरुवातच होतेय श्रावणी सोमवारपासून (Shravan Somvar 2024)! श्रावणातले तसे प्रत्येक दिवस खासच मानले जातात. तरीदेखील श्रावण सोमवारचे महत्त्व अधिकच! अशा वेळी केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असेल तर स्त्रियांनी पुढील चुका टाळायलाच हव्या.
असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो. तसेच पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते. म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे. तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये. त्यामुळे त्यांना कुंडली दोष निर्माण होऊ शकतो. ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये, अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असे म्हणतात. मग राहिला वार मंगळवार, शुक्रवार आणि रविवार. हे तिन्ही वार न्हाण्यासाठी योग्य मानले गेले आहेत. रविवारी सुटीचा दिवस म्हणून निवांत अंघोळ करत केसावरुन अंघोळ केली जाते, तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्यादिवशी केस धुतल्याने, स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते.
सोमवार, बुधवार गुरुवार या दिवशी उपास, सण, उत्सव आल्यास केस धुणे लाभदायी ठरते का? तर नाही! शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात. अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते. त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे, पण एरव्ही पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होतो. पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का? तर...
नियम, अटी, बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास धजावतात. मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत, यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होईल हे नक्की.
स्त्रीला दुहिता म्हटले जाते. दुहिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारी! दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर! ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असे नाही, तरीदेखील ती आत्मीयतेने घर सांधून ठेवते. ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते. अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते. म्हणून अनेक व्रत, नियम, उपास स्त्रियांना सांगितले आहेत. कारण परिवर्तनाची सुरुवात तिच्यापासून होते.
केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वरचेवर केस धुणे ही अलीकडे फॅशन झाली आहे. सतत मोकळ्या केसात अडकलेले हात संसाराला हातभार कधी लावणार? हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. रवि, मंगळ, शुक्र अशी एक दिवसाआड केस धुण्याची दिलेली मोकळीक स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत. वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो. केस गळतात, वाढ खुंटते. केसांचा चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीनेही या दिवसांची आखणी केली आहे. परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्याला पचनी पडत नाहीत. अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात. धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिल्या आहेत.
या गोष्टींचा विचार करता, स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवारी नटण्या मुरडण्यात वेळ न दवडता ईश्वर सेवेत तो वेळ व्यतीत करावा हे या नियमाचे सार आहे असे म्हणता येईल.
टीप : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.