Shravan Vrat 2021 : मुला बाळांच्या सुख समृद्धीसाठी श्रावणी शुक्रवारी असे करा 'जीवंतिका व्रत!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:59 IST2021-08-10T16:58:45+5:302021-08-10T16:59:14+5:30
Shravan Vrat 2021 : जिवंतिकेची पूजा आणि त्यानिमित्ताने सुवासिनीचा आणि लेकरांचा पाहुणचार या निमित्ताने सुवासिनींना एक विरंगुळा मिळतो.

Shravan Vrat 2021 : मुला बाळांच्या सुख समृद्धीसाठी श्रावणी शुक्रवारी असे करा 'जीवंतिका व्रत!'
श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी बायकांनी हळद कुंकू देऊन दूध, साखर व फुटाणे प्रसाद म्हणून देतात. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालतात. एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालतात व तिला पुरणपोळीचे भोजन वाढून दक्षिणा देतात.
जिवतीचे चित्र लावून गंध, हळदकुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात आणि ज्यायोगे देहधारणा होते त्या प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पंचप्राणांची प्रतीके म्हणून पुरणाच्या पाच दिव्यांची तिची आरती करतात.
मानवी देहाला अन्नमय, मनोमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय, कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक, शिशू, बाल, पौगंड, तरुण, प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत. जीवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळे ही त्या अवस्थांची प्रतीके आहेत.
जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात. त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण करावे. मुले परगावी असतील तर चारी दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या आणि `हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर' अशी प्रार्थना केली जाते.
जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते. पीतवर्ण या विकारांचे प्रतीक मानण्यात येतो म्हणून जीवंतिका व्रत करणाऱ्या महिलांनी त्या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करू नये.
श्रावणी शुक्रवारी कापसाची वस्त्रे हळद कुंकू लावून जिवंतीकेला अर्पण करावी. देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवावा. त्यानिमित्ताने देवी स्वरूपात सुवासिनीचा पाहुणचार करून तिच्या मुला बाळांना भेटवस्तू देऊन जिवतीचा सन्मान करावा. अशा रितीने जिवंतिकेची मनोभावे ही पूजा करून देवीची कृपा प्राप्त करावी.