Shravan Vrat 2021 : सर्व मनोरथपूर्तीसाठी श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात दुर्वागणपती व्रत; वाचा सविस्तर माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:19 IST2021-08-11T17:18:46+5:302021-08-11T17:19:16+5:30
Shravan Vrat 2021: गणरायची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तसेच दुर्वा, पत्री या निमित्ताने निसर्गाशी जवळीक व्हावी म्हणून हे व्रत आहे!

Shravan Vrat 2021 : सर्व मनोरथपूर्तीसाठी श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात दुर्वागणपती व्रत; वाचा सविस्तर माहिती!
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. दर महिन्यात दोन चतुर्थी येतात, एक विनायकी आणि दुसरी संकष्टी. उद्या श्रावण मासातील विनायकी चतुर्थी आहे. या चतुर्थीला दुर्वागणपती व्रत सांगितले आहे. नावावरून या व्रताच्या विधीचा अंदाज आला असेल. हे व्रत कसे करतात याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून जाणून घेऊया.
या व्रतासाठी श्रावणातील शुक्ल पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक आहे. म्हणजेच ती तिथी माध्यान्ह पूर्ण झाल्यानंतर संपणारी असली पाहिजे. व्रतकत्र्याने शुचिर्भूत होऊन सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या सुवर्णाच्या मूर्तीची स्थापना करावी. तिला लाल वस्त्र वाहून षोडशोपचारे पूजा करावी.
गणेश चतुर्थीला वाहतात तशी पत्री, फुले वाहावीत. आरती करावी आणि आरतीनंतर 'गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन, व्रत संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन' अशी प्रार्थना करावी. या पूजेत दूर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून पत्रीबरोबर दूर्वा अर्पण कराव्यात.
व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे म्हणजेच एकवेळ जेवावे. हे व्रत दोन, तीन अथवा पाच वर्षे केले जाते. श्रावण शुक्ल चतुर्थीला या व्रताचा प्रारंभ करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या वेळेस अठरा मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. सहा मोदक देवाला, सहा मोदक पुरोहितांना आणि सहा मोदक व्रतकर्त्याने खावेत असा नियम आहे. गणपतीला सहा दूर्वा आणि सहा नमस्कार घालून व्रत पूर्ण करावे.
सद्यस्थितीत सोन्याचा गणपती कोणाकडे असणे तसे दुर्मिळच, म्हणून देवघरातील आपल्या रोजच्या गणपतीला फुले वाहून, नैवेद्य दाखवून हे व्रत पूर्ण करावे.