Shravan vrat 2021: आज श्रावणातला शेवटचा शनिवार; या कथेसारखे शनिदेव तुम्हालाही भेटून उध्दरू शकतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 02:23 PM2021-09-04T14:23:23+5:302021-09-04T14:24:07+5:30

Shravan Vrat 2021 : पोथ्या पुराणांमधल्या कथा आपण कालबाह्य ठरवतो, परंतु त्यातून बोध घेण्याचे ठरवले, तर त्या कथा सार्वकालिक आहेत हे आपल्याला लक्षात येईल.

Shravan vrat 2021: Today is the last Saturday in Shravan; Like this story, Shanidev can meet you and save you! | Shravan vrat 2021: आज श्रावणातला शेवटचा शनिवार; या कथेसारखे शनिदेव तुम्हालाही भेटून उध्दरू शकतात!

Shravan vrat 2021: आज श्रावणातला शेवटचा शनिवार; या कथेसारखे शनिदेव तुम्हालाही भेटून उध्दरू शकतात!

Next

ऐका परमेश्वरा शनिदेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्यादिवशी तो लवकर उठे. सकाळीच जेवी. लेकी मुलं सुनासुद्धा शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता करता श्रावणमास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्यनेमाप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले, 'मुली आज शनिवार आहे. माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळूण आण, त्याच्या भाकरी कर. केनीकुर्डूची भाजी कर, तेरड्याचे बी काढून ठेव.' सुनेने बरं म्हटले. 

ती माडीवर गेली. दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळळे. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्याचे बी वाटले आणि सासूसाऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथे शनिदेव कुष्ठ्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, 'बाई माझे सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल, काहीतरी खायला दे.'

तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. चार तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला लावले, वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्याने तिला आशीर्वाद दिला. 'तुला काही कमी पडणार नाही.' आपले उष्ट वळचणीला खोचले आणि शनीदेव अदृष्य झाले. 

नंतर काही वेळाने घरी सासूसासरा, दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतोषी झाल्या. आपल्या घरात काहीच नव्हते, मग हे असे कशाने झाले, असे ते आश्चर्य व्यक्त करू लागले. 

दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवले. सगळी माणसे घेऊन शेतावर गेला. शनिदेवांनी पुन्हा कुष्ठ्याचे रूप घेतले. ब्राह्मणाचे घरी आला. मागच्यासारखे न्हाऊ घाल, माखू घाल असे म्हणाला. ब्राह्मणाची सून म्हणाली, `बाबा, आम्ही काय करावे? आमच्याजवळ काही नाही.' देव म्हणाले, `जे असेल त्यातले थोडेसे दे.' सून म्हणाली, `माझ्याजवळ काही नाही.' देव म्हणाले, `बरं मग तुझ्याजवळ जे असेल ते नाहीसे होईल.' असा शाप त्यांनी दिला आणि आपण अंतर्धान पावले. संध्याकाळी सगळे आले पण घरी काहीच केलेले नाही पाहून सुनेवर सगळे रागावले. तिने झालेली हकिकत सांगितली. 

पुढे तिसरा शनिवार आला. ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवले. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले. बाकी सगळे जण राबायला शेतावर गेले. मागच्यासारखे शनिदेव पुन्हा आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणाले. तिने जावेसारखे उत्तर दिले. देवाने तिला पूर्वीसारका शाप दिला. अंतर्धान पावले. संध्याकाळी सगळे घरी आले. सुनेने हकिकत सांगितली. सगळ्यांना उपास घडला. 

पुढे चौथा शनिवार आला. ब्राह्मणाने धाकल्या सुनेला घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा केली. सगळे गेल्यावर शनिदेव आले. तिने यावेळीसुद्धा कुष्ठ्याच्या रूपात आलेल्या शनिदेवाची सेवा केली. शनिदेव आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. घरात पुन्हा अन्न धान्य आले. सुनेने स्वयंपाक रांधून ठेवला. संध्याकाळी सगळे आले. सर्वांना आश्चर्य वाटले. सुनेने हकिकत सांगितली. 

इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्यांची दृष्टी उष्ट्या पत्रावळीकडे पडली. त्यांनी ती उघडून पाहिली. त्यात हिरे मोती दृष्टीस पडले. याच पत्रावळीवर तो अतिथी जेवल्याचे सुनेने सांगितले. सासूसासऱ्यांना सुनेचे मोठेपण कळले. घासातला घास तिने काढून दिला म्हणून देव तृप्त झाले आणि घर अन्नधान्याने भरून गेले. धाकट्या सुनेने निष्काम मनाने केलेल्या सेवेमुळे त्यांच्या घरातले दारिद्रय संपले आणि सर्वांची भरभराट झाली. 

गरजवंतांच्या सेवेची सद्बुद्धी तुम्हा आम्हाला होवो आणि शनिदेवांची कृपादृष्टी लाभो, हे सांगणारी संपत शनिवारची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

Web Title: Shravan vrat 2021: Today is the last Saturday in Shravan; Like this story, Shanidev can meet you and save you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.