Shravan Vrat 2022 : महादेवांनी त्रिशूळ हेच शस्त्र का निवडले? मोहोंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले होते!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 04:34 PM2022-08-20T16:34:20+5:302022-08-20T16:34:56+5:30

Shravan Vrat 2022: हिंदू देवी देवता शस्त्र आणि शास्त्र दोन्ही धारण करणारे आहेत. श्रावण मासानिमित्त त्रिशुळाचे महत्त्व जाणून घेऊ!

Shravan Vrat 2022 : Why Mahadev chose Trishul as his weapon? It was also found in Mohenjodaro excavations! | Shravan Vrat 2022 : महादेवांनी त्रिशूळ हेच शस्त्र का निवडले? मोहोंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले होते!

Shravan Vrat 2022 : महादेवांनी त्रिशूळ हेच शस्त्र का निवडले? मोहोंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले होते!

googlenewsNext

अनेक हिंदू देव देवतांच्या हाती त्रिशूळ हे आयुध असते. परंतु त्रिशूळ हे भगवान महादेवाचे आयुध मानण्यात येते. त्रिशूळ म्हणजे एक लांब दांडा आणि पुढे तीन टोक असतात. तीन टोक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्जन, पालन व संहार यांचे दैवत आहेत. असुरशक्तीचा विनाश नि:पात करून प्रजाजनांत सुख, शांती आणि वैभव यावे यासाठी त्रिशूळात शक्ती आणि भक्ती साकार झाली आहे. 

त्रिशूळ हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे आयुध असल्यामुळे ते मोठ्या आवेशात आणि आवेगात फिरवून प्रतिस्पर्ध्यांच्या अंगात खुपसतात, असा रामायणात उल्लेख आढळतो.

बौद्ध धर्मातील बोधिवृक्ष आणि त्रिरत्न या प्रतीकांचे त्रिशूळाशी साम्य आहे. सांची, भरहूत आणि अमरावती येथील बौद्ध शिल्पस्तंभावर त्रिशूळ कोरलेले आहे. कार्ले, भाजे, जुन्नर, बेडसे, कुडा येथील लेण्यातही त्रिशूळ हे चिन्ह प्रामुख्याने आढळते. 

सत्पात्र ब्राह्मणाला म्हणजे योग्यता असलेल्या मनुष्याला दान स्वीकारण्यासाठी बोलावणे पाठवून, सस्नेह, आदराने निमंत्रण करून या महानुभव व्यक्तीस दान न करताच अवमानित, विन्मुख पाठवले, तर निमंत्रणकर्त्यास मनुष्यहिंसेइतके पाप लागते आणि या पापाचा धनी म्हणून त्याला पोटशूळाचा विकार जडतो. 

शारीरिक वेदनेने त्याचे जीवन असह्य होते अशी समजूत असल्याने त्याच्या परिमार्जनासाठी, पापक्षालनासाठी त्रिशूळदान करतात. हे दान कृष्णपक्षातील अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी करावे असा संकेत आहे. रुद्रसुक्ताने, शिवपंचाक्षरी मंत्राने किंवा त्रिशूलाय नम: या नाममंत्राने त्रिशूलाची यथाविधी पूजा करतात.

मोहोंजोदडोच्या उत्खननात त्रिशूळ सापडल्याचा उल्लेख आढळतो. त्रिशूळ हा तीन ज्वाळा असलेल्या अग्नीसारका तेजाळता दिसत असल्यामुळे त्याचा ब्रह्ममूलाशी अनुबंध जोडतात. असा हा परमात्म्याशी, ईश्वराशी नाते असलेला, देवगणांच्या हाती आयुध म्हणून अनुग्रह झालेला, सनातन धर्माच्या शक्तीचे प्रतीक असलेला दुष्टांचा कर्दनकाळ, सृजनांचा तारणहार ठरला आहे. म्हणून शिवलिंगाच्या पूजेबरोबरच शिवालयात त्रिशूळाचीही पूजा होते. 

यावरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदू देवदेवतांनी आपल्या हाती शस्त्र बाळगून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रक्षणाचा आदर्श घालून आहे. आपणही स्वसंरक्षणाची आणि इतरांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे. दर वेळी शस्त्र बाळगलेच पाहिजे असे नाही, तर हाती असलेल्या वस्तूचा शस्त्रासारखा वापर करण्याची मी मनाची तयारी केली पाहिजे. अन्यथा शस्त्र हाती असूनही ते चालवण्याचे बळ अंगात नसेल तर उपयोग नाही. काळाची गरज पाहता आपण स्वतःला आणि पुढच्या पिढीला कणखर बनवले पाहिजे. त्यासाठी हिंदू देवदेवतांकडून प्रेरणा घ्यायला हवी. 

Web Title: Shravan Vrat 2022 : Why Mahadev chose Trishul as his weapon? It was also found in Mohenjodaro excavations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.