श्रावण शुक्रवारी पुत्रदा एकादशी: ‘असे’ करा व्रत; सांगता कशी कराल? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:43 AM2024-08-15T11:43:34+5:302024-08-15T11:46:45+5:30
Shravana Putrada Ekadashi Vrat 2024: श्रावणात पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे? जाणून घ्या..
Shravana Putrada Ekadashi Vrat 2024: चातुर्मासातील व्रत-वैकल्यांचा मास मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशी विविध प्रकारे व्रताचरण केले जाते. श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे. या एकाच दिवशी तीन व्रते आली आहेत. श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी एकाच दिवशी जिवतीची पूजा, वरदलक्ष्मी व्रत आणि पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशी व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व, महात्म्य, व्रताची सांगता कशी करावी, याबाबत जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूंचे पूजन आराधना, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते. अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात. श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचे व्रताचरण वर्षातून दोनदा केले जाते. एक म्हणजे श्रावणात आणि दुसरे म्हणजे पौष महिन्यात. श्रावणातील पुत्रदा एकादशीचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते.
श्रावण पुत्रदा एकादशी: शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४
श्रावण पुत्रदा एकादशी प्रारंभ: गुरुवार, १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजून २६ मिनिटे.
श्रावण पुत्रदा एकादशी समाप्ती: शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०९ वाजून ३९ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी आचरावे, असे सांगितले जात आहे.
‘असे’ करा श्रावणातील पुत्रदा एकादशी व्रत
सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचे आचरण करणाऱ्यांनी पुत्रदा एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर श्रवण करावे. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
श्रावणातील पुत्रदा एकादशी व्रताची सांगता कशी करावी?
पुत्रदा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये, असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी, असे सांगितले जाते.