श्रावणी गुरुवार दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत; पूजाविधी व व्रतकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:39 AM2023-08-23T11:39:57+5:302023-08-23T11:41:12+5:30
Shravan Durva Ashtami Vrat 2023: गणेश पूजनात अतिशय महत्त्व असलेल्या दूर्वांशी निगडीत हे व्रत असून, ते कसे करावे? दुर्वांचे महत्त्व आणि महात्म्य जाणून घ्या...
Shravan Durva Ashtami Vrat 2023: संपूर्ण मराठी वर्षात चातुर्मासाला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आल्यामुळे चातुर्मास विशेष ठरला. यानंतर आता निज श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावणातील दुसऱ्या गुरुवारी शुद्ध अष्टमी तिथी आहे. शुद्ध अष्टमी तिथी दुर्गा देवीला समर्पित असल्याची मान्यता असून, ती दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला दूर्वांचे महत्त्व अन् महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमीचे व्रत केले जाते. हे व्रत नेमके काय आहे? व्रतपूजनाचा विधी, व्रतकथा आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Shravan Durva Ashtami Vrat 2023)
श्रावणाला व्रत-वैकल्यांचा आणि उत्सवांचा महिना मानले गेले आहे. ही व्रत-वैकल्ये आणि परंपरा या निसर्ग, आरोग्य आणि व्यवहारिकतेला धरून आहेत. श्रावणातील प्रत्येक दिवसाला जसे विशिष्ट महत्त्व आहे, तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांना, व्रतांनाही आहे. श्रावणी गुरुवारी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२३ रोजी शुद्ध अष्टमी तिथीला दूर्वाष्टमी व्रत केले जाते. श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपदात गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गणपती बाप्पाला दूर्वा प्राधान्याने वाहिल्या जातात. याच दूर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते. याला दूर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते. अनेक भागात दूर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते. (Shravan Durva Ashtami Vrat Puja Vidhi In Marathi)
दूर्वा अन् शिवलिंगाचे पूजन
अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ, पवित्र अशा जमिनीवर दूर्वा उगवलेल्या असतील, त्या ठिकाणी जाऊन दूर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दूर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी. शिवपूजेत दूर्वा-रशमी तसेच अन्य फुले असणे आवश्यक आहे. शेवटी खोबरे, खजूर यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षता घातलेल्या दह्याचे अर्घ्य द्यावे. स्वत: व्रतकर्त्या महिलांनी त्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा. उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे. तीळ आणि कणीक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते. असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व कुटुंबातील सदस्य, आप्तेष्टमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना द्यावे. (Shravan Durva Ashtami Vrat Significance)
व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी
श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर ऋतुकालोद्भव फुले, फळे वाहावीत. धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. आरती करावी. पूजेच्या शेवटी 'त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तुतासि महीतले । तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ।।' हा श्लोक म्हणावा.
दुर्वांची प्रार्थना करावी
दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे.
दूर्वाष्टमी व्रतकथा श्रवण करणे लाभदायक
दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे. (Shravan Durva Ashtami Vrat Katha)
दुर्वांना अमरत्वाचे वरदान लाभले
समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दूर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दूर्वांवर सांडले. त्यामुळे अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला, अशी कथा पुराणांमध्ये आढळते. त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दूर्वांची पूजा केली जाते. संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ मिळण्यासाठी हे व्रत करावे, असे सांगितले जाते. दूर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दूर्वाच घ्याव्यात, असे आग्रहाने सांगितले जाते.