Shravani Somvar 2024: श्रावणी सोमवारी महादेवाला वाहिलेल्या बेलाच्या पानाचा धनवृद्धीसाठी 'असा' करा उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 02:35 PM2024-08-10T14:35:58+5:302024-08-10T14:36:49+5:30
Shravani Somvar 2024: यंदा श्रावणात ५ सोमवार असणार आहेत, पैकी एक गेला; तरी उर्वरित चार सोमवारांपैकी एका सोमवारी दिलेला उपाय नक्की करा; होईल धनलाभ!
चातुर्मासात श्रावण महिना महत्त्वाचा आहेच, त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या दिवशी आपण उपास करतो आणि शिव आराधना म्हणून जप जाप्य, स्तोत्र पठण आणि शिवाचे नाम घेतो. श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे. त्याबरोबरच पांढरे फुल आणि बेलाचे पानदेखील आपण आठवणीने वाहतो. मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो. बेल पत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फुल, पान पुनर्वापरात आणले जात नाही. मात्र बेल पत्र त्यास अपवाद आहे. हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत. मुळात शिवाला, गणेशाला, हरतालिकेला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंडओळख व्हावी म्हणूनच असते. आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो. त्यातल्या पानांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतील. आपले सण-उत्सव-संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींची खोलवर माहिती घेतली पाहिजे.
सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही. हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व, रज, तम यांचे प्रतीक आहे. हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते. त्यानुसार बेलाशी संबंधित पुढील उपाय अवश्य करा.
धनवृद्धीसाठी उपाय!
यंदा श्रावणी सोमवारी शिव मंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाचण्याआधी बेलाच्या तिन्ही पानांवर प्रत्येकी 'ओम नमः शिवाय' लिहा. ते पान महादेवाला अर्पण करा. महादेवाचा श्लोक, मंत्र भक्तिभावाने म्हणा. अगदीच काही पाठ नसेल तर 'ओम नमः शिवाय' ११ वेळा म्हणा. नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या. पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे, तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा. अवास्तव अपेक्षा न ठेवता, आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेव्हढी रक्कम जमा होऊदे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या. हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिष शास्त्रात नमूद केले आहे. श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा.
टीप - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.