ब्रह्मज्ञानी गजानन महाराजांचे नेमके स्वरुप कसे आहे? पाहा, श्रींचे भक्तांना असलेले अखंड वचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:29 IST2025-02-19T13:26:29+5:302025-02-19T13:29:49+5:30
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री गजानन महाराजांच्या स्वरुपाविषयी थोडक्यात जाणून घेऊया...

ब्रह्मज्ञानी गजानन महाराजांचे नेमके स्वरुप कसे आहे? पाहा, श्रींचे भक्तांना असलेले अखंड वचन
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमत्ताने लाखो भाविक महाराजांचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना मंत्रांचा जप करतात. विविध ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतात. विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन जाते.
श्री गजानन महाराजांनी सुमारे ३२ वर्षे भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजानन महाराजांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.
गजानन महाराज त्रिकालज्ञी होते
गजानन महाराज त्रिकालज्ञी होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. कारण ते ईश्वराचे निस्सीम भक्त होते. यामुळे ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत.
श्री गजानन महाराज हे एक परमहंस संन्यासी
श्री गजानन महाराज हे परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याश्याच्या रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय ह्या पोथीमध्ये आलेले आहेत. गजानन महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे. लाखो भक्तांना आजही गजानन महाराजांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. गजानन महाराजांना कळले की, अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की, त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता; परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. व श्रींनी संजीवन समाधी शेगावीला घेतली.
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||
दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||
गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।।
या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।।
हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।
।। अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ।।
।। श्री गजानन जय गजानन ।।
।। गण गण गणात बोते ।।