गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: अपार कृपा, श्री होतील प्रसन्न; ‘हे’ प्रभावी स्तोत्र म्हणाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:13 IST2025-02-18T14:09:59+5:302025-02-18T14:13:39+5:30

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: आजही गजानन महाराजांच्या अद्भूत लीलांचा प्रत्यय, अनुभव अनेकांना आला आहे. हे प्रभावी स्तोत्र म्हणणे पुण्यफलदायी आणि शुभ मानले गेले आहे. जाणून घ्या...

shree gajanan maharaj prakat din 2025 you will get immense grace and blessings just recite most impactful gajanan bavani stotra | गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: अपार कृपा, श्री होतील प्रसन्न; ‘हे’ प्रभावी स्तोत्र म्हणाच!

गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: अपार कृपा, श्री होतील प्रसन्न; ‘हे’ प्रभावी स्तोत्र म्हणाच!

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत. त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या या दैवी शिष्याने अनेक भाविकांना सन्मार्ग दाखवला. 

गजानन महाराजांची नित्यनेमाने, न चुकता सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करणारे अनेक भाविक आहेत. लाखो लोक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-परदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत.  गजानन महाराजांसंदर्भात अनेक स्तोत्रे, मंत्र, श्लोक आढळून येतात. परंतु, यापैकी गजानन बावनी हे स्तोत्र प्रभावी मानले गेले आहे. या स्तोत्रात ते कसे आचरावे, त्याची फलश्रुती काय, याबाबतचे आश्वासन पाहायला मिळते. 

अत्यंत प्रभावी गजानन बावनी स्तोत्र

आजही मोठ्या प्रमाणावर गजानन महाराजांना भजले, पूजले जाते. आजही गजानन महाराजांच्या अद्भूत लीलांचा प्रत्यय, अनुभव अनेकांना आला आहे. संकटे, समस्या, अडचणी आल्या असतील, काही मार्ग दिसत नसेल तर गजानन महाराजांना शरण जावे. आपले दुःख श्रींना सांगावे. गजानन महाराजा भक्तांचा हाकेला लगेच धावून येतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. गजानन महाराजांच्या बावनी स्तोत्राचे नियमितपणे पठण किंवा श्रवण करावे. गजानन बावनी नित्य ध्यानी मनी ठेवावी. बावन्न गुरुवार या गजानन बावनीचे मनोभावे संकल्पयुक्ताने पठण किंवा श्रवण केल्यास सारी विघ्ने दूर होतील. सुख-समृद्धीचा लाभ घेता येईल. सगळ्या चिंता दूर होतील. संकटातून तरुन जाता येईल. परंतु, यासोबत सदाचाराचा अंगीकार करायला हवे, असे सांगितले जाते.

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१|| 
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२|| 
सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३|| 
माघा वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४|| 
उष्ट्या पत्रावालीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५|| 
बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७|| 
तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंच वणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९|| 
मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०|| 
विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११|| 
मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२|| 
त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३|| 
कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४|| 
वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५|| 
जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६|| 
टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७|| 
बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८|| 
रामदास रूपे तुला | दर्शन देवोनी तोषविला ||१९|| 
सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०|| 
कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१|| 
घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२|| 
दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३|| 
भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४|| 
आज्ञा तव शिरसावंद्य | काकाही मानती तुज वंद्य ||२५|| 
विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवरयाला ||२६|| 
पिताम्बराकार्वी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७|| 
सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८|| 
सवडत येशील गंगाभारती | थुंकून वारिली रक्तपिती ||२९|| 
पुंडलिकाचे गंडांतर | निष्टा जाणून केले दूर ||३०|| 
ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१|| 
माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२|| 
लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३|| 
कवर सुताची कांदा भाकर | भक्शिलास तू त्या प्रेमाखातर ||३४|| 
नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५|| 
बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावारी विरक्त प्रीती ||३६|| 
बापुना मनी विठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७|| 
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८|| 
वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९|| 
उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०|| 
देहान्ताच्या नंतरही | कितीजना अनुभव येई ||४१|| 
पडत्या मजूर झेलीयेले | बघती जन आश्चर्य भले ||४२|| 
अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३|| 
गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४|| 
शरण जाऊनी गजानना | दुक्ख तयाते करी कथना ||४५|| 
कृपा करी तो भक्तांसी | धावून येतो वेगेसी ||४६|| 
गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७|| 
बावन्न गुरुवार नेमे | करी पाठ बहु भक्तीने ||४८|| 
विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९|| 
चिंता सारया दूर करी | संकटातूनी पार करी ||५०|| 
सदाचार रत साद भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१|| 
सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला || जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||

।। अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ।।

।। श्री गजानन जय गजानन ।।

।। गण गण गणात बोते ।।

Web Title: shree gajanan maharaj prakat din 2025 you will get immense grace and blessings just recite most impactful gajanan bavani stotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.