जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारतावेळी किती होते वय? ५ अद्भूत गोष्टी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 04:55 PM2023-09-05T16:55:18+5:302023-09-05T16:55:31+5:30

Shri Krishna Janmashtami 2023: महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका युद्धावेळी बजावल्या. जाणून घ्या, काही अद्भूत गोष्टी...

shri krishna janmashtami 2023 know about sri krishna rashi lord krishna age during mahabharata and some amazing facts | जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारतावेळी किती होते वय? ५ अद्भूत गोष्टी जाणून घ्या

जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारतावेळी किती होते वय? ५ अद्भूत गोष्टी जाणून घ्या

googlenewsNext

Shri Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्णाचे नाव घेतले की, जसे गोकुळ, राधा, बाळकृष्णाच्या लीला आठवतात, तसे श्रीकृष्णाचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना त्याच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांची आठवण काढली जाते. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. महाभारत युद्ध झाले तेव्हा श्रीकृष्णांचे वय किती होते? श्रीकृष्णांची रास कोणती? जाणून घ्या...

यंदाच्या वर्षी ०६ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. महाभारताचा हा महानायक, भागवतपुराण तर कितीही वेळा पारायणे केली तरीही त्याच्या आठवणी जागविण्यातील आनंद घेण्याचा मोह होतो. गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेता घेता उभे आयुष्य कमी पडते असा याचा महिमा. महाभारत युद्ध तब्बल अठरा दिवस चालले. अनेक वीर योद्धे यावेळी कामी आले. हातात शस्त्र न घेताही मुसद्देगिरी आणि नेमक्या धोरणांनी पांडवांना महाभारताच्या विजयश्रीपर्यंत श्रीकृष्णांनी नेले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्णांचे वय किती होते? एकूण किती वर्ष श्रीकृष्ण जगले? पाहुया...

महाभारत युद्धाचे सर्व व्यवस्थापन श्रीकृष्णांनी केले

महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी आपल्या सेनेचा तळ कुरुक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात सरस्वती नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या समंत्र पंचक तीर्थाच्या जवळ हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावर टाकला. कौरवांनी कुरुक्षेत्राच्या पूर्व भागात तिथून काही योजने दूर एका सपाट मैदानावर आपला तळ टाकला. या सर्वांचे व्यवस्थापन श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते, असे सांगितले जाते. तब्बल अठरा दिवसांनंतर महाभारत युद्ध अखेरीस शमले. महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३ आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. यापैकी कौरवांकडून कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा; तर, पांडवांकडून युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी आदी जिवंत राहिले. युयुत्सु हा कौरव पांडवांच्या बाजूने लढल्यामुळे तो एकच कौरव म्हणून जिवंत राहिला. बाकी सर्व कौरव युद्धात मारले गेले.

​महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णांचे वय किती होते? 

महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्धावेळी अगदी चोख बजावल्या. एका संशोधनानुसार महाभारत युद्ध झाले, त्यावेळी श्रीकृष्ण ८९ वर्षांचे होते, असे सांगितले जाते. महाभारत युद्धाच्या तब्बल ३६ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, असे सांगितले जाते.

श्रीकृष्णांची रास कोणती? 

श्रावण महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीविष्णूंनी आठवा अवतार कृष्णावतार धारण केला होता. ज्योतिषीय गणना आणि पुराणातील काही माहितीनुसार कृष्णाचा जन्म अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि लग्न स्थान वृषभ असताना झाला. त्यावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान होता. एकंदरीत या ग्रहमानामुळे श्रीकृष्णांची रास वृषभ असल्याचे सांगितले जाते.


 

Web Title: shri krishna janmashtami 2023 know about sri krishna rashi lord krishna age during mahabharata and some amazing facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.