श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 10:02 AM2023-09-06T10:02:33+5:302023-09-06T10:03:10+5:30

Shri Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जयंतीला केवळ जन्माष्टमीचे नाही, तर एकूण ५ प्रकारची व्रते करण्याची परंपरा आहे. कोणती व्रते केली जातात? ती कशी करतात? का केली जातात? जाणून घ्या...

shri krishna janmashtami 2023 know about why should we do celebrate and 5 vrat tradition on shravan krishna janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

googlenewsNext

Shri Krishna Janmashtami 2023: श्रावण वद्य अष्टमीला संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. श्रीकृष्ण जयंती व्रत, सण, उत्सव या तीनही माध्यमातून साजरी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. यंदाच्या वर्षी ०६ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. मात्र, श्रीकृष्ण जयंतीला केवळ जन्माष्टमी नाही, तर एकूण ५ प्रकारची व्रते करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. कोणती आहेत ती व्रते? श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? जाणून घेऊया...

श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक अद्भूत योग तयार होत आहेत. ०६ सप्टेंबर रोजी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असताना एक विशेष योग जुळून येत आहे. श्रावण कृष्ण पक्ष, मध्यरात्री अष्टमी तिथी आहे. जेव्हा जन्माष्टमी बुधवार किंवा सोमवारी येते तेव्हा ती खूप शुभ मानली जाते. यावेळी ०६ सप्टेंबर रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. जेव्हा असा योग जुळून येतो, तेव्हा त्याला जयंती योग म्हणतात, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे?

श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. स्नानादी नित्य कर्मांनंतर सूर्यासह सर्व दिक्पती, भूमाता, पंचमहाभूते, यम, काल, संधी, ब्रह्म आदी सर्वांना स्मरणपूर्वक नमस्कार करावा. आसनस्थ व्हावे. हातामध्ये फुले, गंध, फळे, पाणी घेऊन “माझ्या सर्व पापांचे क्षालन व्हावे आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जाव्यात म्हणून मी हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करीत आहे,” असा संकल्प करावा. 

कृष्णजन्माची यथाशक्ती सिद्धता

रात्रौ कृष्णजन्माची यथाशक्ती सिद्धता म्हणजेच तयारी करावी. ठीक बारा वाजता घरातील सर्व मंडळींनी अथवा मंदिरामध्ये सर्व भक्तमंडळींनी एकत्र येऊन कृष्णजन्म साजरा करावा. देवकी, वसुदेवासह सर्वांच्या नावांचा उच्चार करावा. देवकीमातेला आदरपूर्वक अर्घ्य द्यावे. श्रीकृष्णाला फराळाचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी नवमीला पंचोपचारांनी त्याची उत्तरपूजा करावी. नंतर महानैवेद्य दाखवावा. देवमूर्ती जर शाडूची असेल तर तिचे विधिपूर्वक जलाशयात विसर्जन करावे. धातूची मूर्ती असल्यास ती पुन्हा नेहमीच्या स्थानी देव्हाऱ्यात ठेवावी. केवळ संतती, संपत्तीसाठी नव्हे, तर सर्वांना अतिशय प्रिय असलेल्या भगवान श्रीकृष्णाबद्दलचे प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी हे व्रत केले जावे. अशीदेखील श्रीकृष्णजयंती ही ‘उत्सव’ म्हणूनच साजरी करण्याची आपली परंपरा आहे.

श्रावण अष्टमीचे जयंती व्रत 

श्रावण कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्र असले तर हे जयंती व्रत करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म याच अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर झाला होता, त्याचे स्मरण म्हणून हे व्रत कृष्ण भक्त करतात. यशोदामाता आणि बाळकृष्ण ह्या व्रतदेवता असतात. चौरंगावर पाच तऱ्हेच्या पानांनी सजविलेल्या कलशाची स्थापना करावी. त्यावर ताम्हण ठेवावे. ह्या ताम्हणात कृष्णाला दूध पाजणाऱ्या यशोदामातेची मूर्ती स्थापित करावी. त्या दोघांच्या आजूबाजूला चंद्र, रोहिणी ह्यांच्या मूर्ती ठेवाव्यात, नंतर या साऱ्यांची आनंदाने पूजा करावी. 

श्रावण वद्य अष्टमीपासून दशफल व्रत

या व्रतात श्रावण वद्य अष्टमीपासून पुढचे नऊ दिवस मिळून एकूण दहा दिवस रोज तुळशीच्या दहा पानांनी गोपाळकृष्णाची पूजा करावी. दहा सुतांचा दोरा व्रतकर्त्याने आपल्या हातात बांधावा. दहा-दहा पुऱ्यांचे  वायन द्यावे. संतती आणि ऐश्वर्य ह्यांची प्राप्ती हे या व्रताचे फल सांगितलेले आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे, असेही सांगितले आहे. स्त्री-पुरुष समानतेचे युग असल्यामुळे स्त्रियांप्रमाणे पुरुष वर्गानेही हे व्रत करण्यास काहीच हरकत नाही. भुकेलेल्या कोणालाही पुऱ्या-भाजी-खीर असे वायन दिल्यास ते अधिक योग्य ठरेल. राहत्या इमारतीमधील लहान मुलांना, स्त्रियांना, शेजाऱ्यांना आवर्जून निमंत्रण देऊन त्यांना प्रसाद म्हणून खीर-पुऱ्या द्यावेत किंवा मुलांच्या मित्र-मैत्रिणींना बोलावून त्यांना खाऊ देऊन हे व्रत पूर्ण करावे.

गोकुळ-मथुरेतील नंदोत्सव

हा उत्सव उत्तर प्रदेशात विशेषकरून गोकुळात आणि मथुरेत साजरा केला जातो. ह्या दिवशी हळद घातलेले दही एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. म्हणून ह्याला ‘दधिकांदौ’ असे दुसरे नाव आहे. आपल्याकडील दहीकाल्याचाच हा उत्तर प्रदेशीय प्रकार आहे. हळद आणि कुंकू घालून रंगीत केलेले पाणी पिचकारीने एकमेकांवर उडविले जाते. तो उत्सव आपल्या धुळवडीसारखा, होळीसारखा साजरा केला जातो. या दिवशी नाचगाण्याचे कार्यक्रमही होतात. काही उत्सवात बदल केले जात नाहीत. त्यापैकी हा एक उत्सव आहे. शिवाय भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्मसोहळ्यातील हा एक भाग आहे. दही-साखर, ताक, लस्सी असे पेयपदार्थ एकमेकांना प्रेमाने द्यावेत. मात्र, ते फुकट घालवू नयेत, असे सांगितले जाते. 

रोहिणी अष्टमी

श्रावण कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्र असल्यास या अष्टमीला ‘जयंती’ असे नाव आहे. कारण भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्म रोहिणीयुक्त अष्टमीला झाला होता. म्हणून ह्या तिथीचा गौरव करण्यासाठी हे व्रत योजिले गेले. या दिवशी उपवास करावा. भगवान श्रीकृष्ण ची पूजा करावी. एवढे दोनच व्रतनियम आहेत. पापनाशार्थ आणि मरणोत्तर विष्णुलोकाच्या प्राप्तीसाठी हे व्रत करण्याची वैष्णवांमध्ये प्रथा आहे. कुठल्याही फलाची आशा धरून नव्हे तर भगवान श्रीकृष्णांवरील प्रेमापोटी ही अष्टमी अशीही जन्मोत्सव म्हणून भारतभर सर्वत्र सारख्याच उत्साहाने साजरी होते. ‘अधिकस्य अधिकं फलम्’ ह्या न्यायाने ह्या रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीलाही हे ‘रोहिणी अष्टमी’चे व्रत केले जाते. 

आपण भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक कृतीचे स्मरण एकेका दिवसाच्या सोहळ्यानेच करतो. मग ती गोपाष्टमी असो, गोपाळकाला असो की, गोवर्धन पूजा असो. विशेष म्हणजे आठवणींनी भारलेल्या ह्या सगळ्या व्रतांचा सण किंवा उत्सव बनून ते सामुदायिक रीतीनेच साजरे केले जातात हे विशेष! भगवान श्रीकृष्ण लहानपणी गोकुळात सगळ्या गोप-गोपिकांमध्ये रमले, बागडले, वाढले. पुढेही पांडवांबरोबर सातत्याने सावलीसारखे राहिले. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित सारी व्रते आपण एकेकट्यांनी साजरी करीत नाही. संपूर्ण समाजाला कुठलाही भेदभाव न करता आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याने आनंद वाढतो हा संदेश भगवंतांनी आपल्या ह्या कृतीतून घरोघरी निरंतर दिला. सुदामा, पेंद्या, कुब्जादेखील त्यांना तितकीच महत्त्वाची आणि प्रिय वाटत होती – हे त्यांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला माहीत आहेच. आपणही समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदुबळ्यांना मानाने, प्रेमाने वागविण्याचा वसा का घेऊ नये?


 

Web Title: shri krishna janmashtami 2023 know about why should we do celebrate and 5 vrat tradition on shravan krishna janmashtami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.