प्रकट दिन: स्वामींची इतकी सेवा, नामस्मरण करुनही इच्छा पूर्ण होत नाही? नेमके काय चुकते? वाचा
By देवेश फडके | Updated: March 25, 2025 10:18 IST2025-03-25T10:09:59+5:302025-03-25T10:18:09+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: नित्यनेमाने, न चुकता स्वामींची सेवा, नामस्मरण, उपासना केली तरी मनासारखी इच्छापूर्ती का होत नाही? जाणून घ्या...

प्रकट दिन: स्वामींची इतकी सेवा, नामस्मरण करुनही इच्छा पूर्ण होत नाही? नेमके काय चुकते? वाचा
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. स्वामींबद्दल जेवढे लिहावे, बोलावे, ऐकावे, तेवढे कमीच आहे. स्वामींच्या लीला अगाध आहेत. स्वामींचा थांग कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात. नित्येनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देश-विदेशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो.
स्वामी भाविकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात
श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. समस्या, अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल, तर स्वामींना मनापासून हाक मारली, तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते, तेव्हा स्वामींना मनापासून हाक मारावी, स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात. संकटमुक्त करतात, अडचण दूर करतात, असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव देतात, असे अनेक जण आवर्जून सांगत असतात.
स्वामींची इतकी सेवा, नामस्मरण करुनही इच्छा पूर्ण होत नाही?
हजारो स्वामी भक्त असेही असतात की, ते निरपेक्षपणे स्वामी सेवा करत असतात. केवळ स्वामींची सेवा घडावी. आपल्या सेवेत कधी कमतरता राहू नये. जी आपण स्वामींची सेवा करणार आहोत, ती मनापासून असावी, असा अनेकांचा आग्रह असतो. स्वामीचरणी अगदी लीन होतात. पण अनेकदा कळत-नकळत काहीतरी अपेक्षा, मागणे ठेवले जाते. नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो. मठात न चुकता जातो. गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो. जे शक्य होईल, ते सगळे करतो, असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत, जी अपेक्षा आहे, त्याची पूर्ती होत नाही, असे अनेकांना वाटत असते. असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते.
स्वामी सेवा केली तरी नेमके काय चुकते? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
आपण अनेकदा आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे आप्तांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी, हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो. आपापल्या परिने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमूक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमूक अमूक एवढी सेवा करत आहे, असेही सांगतो. इथेच चूक होते, असे सांगितले जाते. मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत, असे सांगितले जाते. त्याची वाच्छता करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमूक करतो, तमूक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो, असे तर अजिबातच सांगू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदीच बोलावेसे वाटले, तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील, असे सांगितले जाते. स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव असावा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा.
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥