प्रकट दिन: मनापासूनची इच्छा असते, पण सेवा शक्य होत नाही? स्वामींची मानसपूजा करा, कशी करावी?

By देवेश फडके | Updated: March 28, 2025 12:18 IST2025-03-28T12:17:56+5:302025-03-28T12:18:23+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2025: इच्छा असूनही मनासारखी स्वामी सेवा करणे शक्य नसेल, तर स्वामींची मानस पूजा करावी, असे सांगितले जाते. मानसपूजा म्हणजे काय? कशी करावी? जाणून घ्या...

shri swami samarth maharaj prakat din 2025 how do perform shree swami samarth maharaj manaspuja know about what exactly meaning of manas puja in marathi | प्रकट दिन: मनापासूनची इच्छा असते, पण सेवा शक्य होत नाही? स्वामींची मानसपूजा करा, कशी करावी?

प्रकट दिन: मनापासूनची इच्छा असते, पण सेवा शक्य होत नाही? स्वामींची मानसपूजा करा, कशी करावी?

Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरुपात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा अधिक कल असतो. दररोज, नित्यनेमाने, नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात. परंतु, प्रकट दिनाचे औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते. 

अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात. केवळ अक्कलकोट नाही, तर जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे मनात असूनही अनेकदा तसेच आपल्या हातून घडत नाही. मनात संकल्प केला, तरी तो सिद्धीस नेणे शक्य होत नाही. संकल्प सिद्धी झाली की, मनाला लागून राहते. आपल्या हातून स्वामी सेवा घडली नाही, याची टोचणी मनाला लागून राहते. अशा वेळी निराश न होता मानस पूजा करावी, असे सांगितले जाते. 

मानस पूजा म्हणजे नेमके काय? 

कोट्यवधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची देवपूजा केली जाते. आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्युलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते. अनेकदा नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते. अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात. वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजा करणे जमत नाही. अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा. मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. 

स्वामींच्या मानस पूजेची योग्य पद्धत कोणती?

मानस पूजा करणे सोपे नाही, असे म्हटले जाते. कारण त्यात नुसते शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. मानस पूजा म्हणजे काय? तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा. जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा. शिव मानस पूजा किंवा देवी मानस पूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानस पूजाच परमेश्वराला अपेक्षित असते. प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे आणि पुढे दिलेली मानस पूजा संपूर्ण मन एकाग्र करून करावी.

श्री स्वामी समर्थ मानस पूजा

नमो स्वामीराजम दत्तावताराम ।
श्री विष्णू ब्रम्हा शिवशक्तिरूपम ।।
ब्रह्मस्वरूपाय करूणाकाराय ।
नमो नमस्ते ।।

हे स्वामी दत्तात्रय हे कृपाळा ।
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ।।
कुठे माय माझी म्हणे बाळ कैसा ।
समर्थ तुम्हाविना हो जीव तैसा ।।

स्वामी समर्थ तुम्ही स्मर्तगामी ।
हृदयसानी या बस प्रार्थितो मी ।।
पूजेचे यथासांग साहित्य केले ।
मखरात स्वामी गुरु बैसले ।।

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती ।
जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती ।।
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ ।
परब्रम्ह साक्षात गुरुदेव दत्त ।।

सुवर्ण ताटी महारातन ज्योती ।
ओवाळुनि अक्षता लावू मोती ।।
शुभारंभ एस करुनि पूजेला ।
चरणावरी ठेवू या मस्तकाला ।।

हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा ।
तुझी पद्य पुजा करी बाळ तुझा ।।
प्रणिपात साष्टांग शरणागताचा ।
तुम्हा वाहिला भर या जीवनाचा ।।

हि ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा ।
शिव शंकराची असे शक्तिपूजा ।।
दही दूध शुद्धहोदकाने तयाला ।
पंचामृती स्नान घालू प्रभूला ।।

वीणा तुताऱ्या किती वाजताती ।
शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।।
म्हणती नगारे गुरुदेव दत्त
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ ।।

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली ।
श्री दत्त स्वामी सी या स्नान घाली ।।
महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया ।
महिमा तयांचा काळात जगा या ।।

मी धन्य झालो हे तिथे घेता ।
घडू दे पूजा हि यथासांग आता ।।
अजानुबाहू भव्य कांती सतेज ।
नसे मानवी देह हा स्वामी राज ।।

प्रत्यक्ष श्रीसद्गुरू दत्तराज ।
तथा घालूया रेशिमी वस्त्रसाज ।।
सुगंधित भाळी तिला रेखियला ।
शिरी हा जरी टोप शोभे तयाला ।।

वक्ष स्थळी लाविल्या चंदनाचा ।
सुवास तो वाढावी भाव साचा ।।
शिरी वाहूया बिल्व तुलसी दलाते ।
गुलाब जय जुई अत्तराते ।।

गंधाक्षता वाहुनी या पदाला ।
हि अर्पूया जीवन पुष्पमाला ।।
चरणी करांनी मिठी मारू देई ।
म्हणे लेकरांसी सांभाळ आई ।।

इथे लावया केशर कस्तुरीचा ।
सुगंधी हा खूप नाना प्रतीचा ।।
पुष्पांजली हि तुम्हा अर्पियेली ।
गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली ।।

करुणावतारी अवधूत कीर्ती ।
दयेची कृपेची जशा शुद्ध मूर्ती ।।
प्रभा काकली शक्तीच्या मंडलाची ।
अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची ।

हृदयमंदिरांची हि स्नेह्ज्योती ।
मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ।।
करू आरती आर्तभावे प्रभूची ।
गुरुदेव स्वामी स्वामी दत्तात्रयाची ।।

पंचारती हि असे पंचप्राण ।
ओवाळुनि ठेवू चरणांवरून ।।
निघेना शब्द बोलू मी तोही ।
मनीचे तुम्ही जनता सर्व काही ।।

हे स्वामीराजा बस भोजनाला ।
हा पंच पक्वान्न नैवेद्य केला ।।
पुरांची पोळी तुम्हा आवडीची ।
लाडू कारंजी असे हि खव्याची ।।

डाळिंब, द्राक्षे, फळे आणि मेवा ।
हे केशरी दूध घ्या स्वामी देवा ।।
पुढे हात केला या लेकराने ।
प्रसाद द्यावा आपुल्या कराने ।।

तांबूल घ्यावा स्वामी समर्था ।
चरणांची सेवा करू द्यावी आता ।।
प्रसन्नतेतून मागू मी काय ।
हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय ।।

सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू ।
दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ ।।
नको दूर लोटू आपुल्या मुलासी ।
कृप छत्र तुमचेच या बालकासी ।।

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला ।
पदी ठेवू शीर शरणांगतला ।।
हृदयी भाव यावे असे तळमळीचे ।
करो पूर्ण कल्याण जे या जीवाचे ।।

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा ।
नका वेळ लावू कृपा हसत ठेवा ।।
मणी पूजनाची अशी दिव्य ठेव ।

वसो माझिया अंतरी स्वामी देव ।।
वसो माझ्या अंतरी स्वामी देव ।
वसो माझ्या अंतरी स्वामी देव ।।

|| श्री दत्तार्पणमस्तु ||

|| श्रीगुरूदेव दत्त ||

|| श्री स्वामी समर्थ ||

 

Web Title: shri swami samarth maharaj prakat din 2025 how do perform shree swami samarth maharaj manaspuja know about what exactly meaning of manas puja in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.