प्रकट दिन: स्वामींची नित्य सेवा नेमकी कशी करावी? ५ गोष्टींकडे लक्ष द्या, अद्भूत अनुभूति घ्या

By देवेश फडके | Updated: March 22, 2025 11:16 IST2025-03-22T11:12:00+5:302025-03-22T11:16:44+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2025: पहिल्यांदाच स्वामी सेवा सुरू करायची असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यावी? कोणत्या गोष्टींचा समावेश करायलाच हवा? जाणून घ्या....

shri swami samarth maharaj prakat din 2025 know how to properly offer nitya seva to swami daily and should pay attention on these 5 things to have a great experience | प्रकट दिन: स्वामींची नित्य सेवा नेमकी कशी करावी? ५ गोष्टींकडे लक्ष द्या, अद्भूत अनुभूति घ्या

प्रकट दिन: स्वामींची नित्य सेवा नेमकी कशी करावी? ५ गोष्टींकडे लक्ष द्या, अद्भूत अनुभूति घ्या

Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही, तर भक्तांना दिलेले अभय आहे, असे मानले जाते. तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी, ही स्वामी भक्तांची कालातीत श्रद्धा आहे. स्वामी पाठीशी नित्य असतात, असा हजारो भाविकांचा अनुभव आहे. काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारेही अनेक जण आहेत. अनेक जण आपापल्या परिने स्वामींची सेवा करीत असतात. परंतु, अनेकांना स्वामींची नित्य सेवा कशी करावी, याबाबत साशंकता असते.

श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य, नियमित, दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्यापरिने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थाची नित्यसेवा केली, तर आपल्या जीवनात समृद्धी मिळते, असे म्हटले जाते. स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो. सेवेतून काहीतरी मिळावे, अशी अपेक्षा आपुसकच केली जाते. परंतु, केवळ काहीतरी मिळण्यासाठी सेवा करू नये. आपण केवळ आपले कर्म करत राहावे, स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील, याबाबतही निश्चिंत असावे. कोणतीही सेवा असो, ती अगदी प्रामाणिकपणे, निर्मळ मनाने, एकाग्रतेने, मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावी. उत्कट भाव-भक्तीची ताकद मोठी असून, अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते, असे मानले जाते. 

श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा नेमकी कशी करावी? 

स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, ती आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते. नित्यसेवेद्वारे भक्तीचे गहिरे नाते स्वामींशी जोडता येते. ही सेवा आपल्या मनास शुद्ध आणि शांत ठेवते. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देतो. पहिल्यांदा स्वामी सेवेस सुरुवात करणार असाल, तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना, त्याची नित्यनेमाने पूजा, स्वामींना नियमित नैवेद्य, स्वामी मंत्रांचा जप, स्वामी चरित्राचे पारायण अशा काही गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो. 

स्वामींची घरी स्थापना, नैवेद्य आणि मंत्रांचे जप

तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा तसबीर नसेल, तर स्वामींचा जो भाव भावेल, तसा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणू शकता. स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी. गुरुवार हा दिवस दत्तगुरु, दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून, हा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे. ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे, ती जागा पवित्र असावी आणि कायम स्वच्छ तसेच नीट नेटकी अशीच ठेवावी. तुम्ही तुमचे कुळधर्म, कुळाचार, परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकतात. पंचोपचार किंवा षोडषोपचार पूजा करणे कधीही श्रेयस्कर. परंतु, धावपळीच्या जगात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी शॉर्टकट जरी वापरायचा नसला, तरी योग्य पद्धतीनेच स्वामींचे पूजन करावे. संपूर्ण समर्पण भाव ठेवावा. मनापासून स्वामी पूजन, सेवा करावी. दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर दिवा लावावा. तसेच स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा. असे करणे शुभ मानले गेले आहे.

स्वामींना नैवेद्य कसा दाखवावा? काय काळजी घ्यावी?

दररोज न चुकता जशी स्वामींची पूजन सेवा करणे महत्त्वाचे आहे, तसेच स्वामींना दररोज नैवेद्य दाखवावा. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल, ते स्वामींना अर्पण करावे. स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच. स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा. उदा. पिवळे पेढे, पिवळ्या रंगाची मिठाई वगैरे. अस्वच्छ हाती नैवेद्य ठेवणे टाळा. नैवेद्य दाखवताना स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अनावश्यक द्वेष, नाराजी किंवा नकारात्मक भावना ठेवून नैवेद्य दाखवू नका. नैवेद्य दाखवताना निरंजन आणि अगरबत्ती लावणे विसरू नका. स्वामींना नेहमी चांगले आणि सर्वोत्तम असेच अर्पण करा.

स्वामी मंत्रांचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे पारायण

स्वामींच्या नित्यसेवेत मंत्रजप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. याशिवाय, स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्रांचा उपयोग करा. मंत्र जप करत असताना, मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्रांचा उच्चार करा. मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. घरातील कामे करताना नाम घेता येऊ शकते. तसेच “स्वामी चरित्र” आणि “सारामृत” हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करतात. ह्या ग्रंथांचा वाचन भक्तीला प्रगल्भ करते. स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्याच्या अध्यात्मिक शिक्षणांचा अभ्यास केल्याने, भक्त आपल्या जीवनात तात्त्विक समज आणि शुद्धता आणू शकतो. “सारामृत” वाचनामुळे मनावर पवित्र प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनातील हरकत, वाद, आणि चिंता दूर होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. नियमितपणे पारायण करणे, सप्ताह करणे शक्य झाले नाही, तरी वर्षातून एकदा तरी स्वामी चरित्र सारामृत पठण करावे, असे सांगितले जाते.

स्वामींची नित्यसेवा केली, तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण दिव्य आणि समृद्ध होईल. त्यासाठी आवश्यक साहित्य, पूजा पद्धती, मंत्र जप, आणि चरित्र वाचन यावर श्रद्धा आणि निष्ठेने कार्य करा. यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभू शकेल. स्वामींच्या कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल. हे सर्व करत असताना आपल्या मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन, स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल.

।। श्री स्वामी समर्थ ।।

 

Web Title: shri swami samarth maharaj prakat din 2025 know how to properly offer nitya seva to swami daily and should pay attention on these 5 things to have a great experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.