श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: नियमितपणे ‘स्वामी समर्थ अष्टक’ म्हणा, होईल स्वामींची अपार कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:19 IST2025-03-30T16:19:35+5:302025-03-30T16:19:50+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ‘स्वामी समर्थ अष्टक’ एक प्रभावी स्तोत्र मानले गेले असून, याचे नियमितपणे पठण वा श्रवण केल्याचा विविध प्रकारे लाभ मिळू शकतो, असा विश्वास स्वामी भक्त व्यक्त करतात, असे सांगितले जाते.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: नियमितपणे ‘स्वामी समर्थ अष्टक’ म्हणा, होईल स्वामींची अपार कृपा!
Shree Swami Samarth Prakat Din 2025: चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. दररोज न चुकता स्वामींचे नामस्मरण, पूजन करणारे लाखो भक्त आढळून येतील. नित्यनेमाने स्वामींचे दर्शन घेणारेही हजारो जण आहेत. स्वामींची उपासना, भक्ती, नामस्मरण करण्याचे विविध मार्ग, पद्धती सांगितल्या जातात. स्वामींवरचा विश्वास आणि आपापल्या परिने त्या केल्यावर त्याचे शुभफळ मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतात. स्वामींचे अनेक प्रकारचे मंत्र, श्लोक आहेत. याचपैकी एक असलेले ‘स्वामी समर्थ अष्टक’ प्रभावी मानले जाते. याचे नियमितपणे पठण वा श्रवण केल्याचा लाभ मिळू शकतो, असा स्वामी भक्तांना विश्वास आहे.
स्वामींना हाक मारली अन् समस्या सुटली, असे अनुभव अनेकांच्या असल्याचे सांगितले जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी येत असतात. काम करत असलो, तरी यश येताना मिळताना दिसत नाही. केलेली मेहनत फळत नाही, असे वाटत राहते. अशा वेळेस अनेकदा आपण आपल्या आराध्याला शरण जातो. त्याची कृपा व्हावी म्हणून प्रयत्नशील असतो. स्वामी समर्थ महाराज असेच लाखो लोकांचे आराध्य आहेत. स्वामीबळ पाठीशी असेल, तर समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून नामस्मरण, उपासना, पूजन केले पाहिजे, असे सांगितले जाते.
स्वामी समर्थ अष्टक
असें पातकी दीन मीं स्वामी राया ।
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ॥
नसे अन्य त्राता जगी या दीनाला ।
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ १ ॥
मला माय न बाप न आप्त बंधू ।
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ॥
तुझा मात्र आधार या लेकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ २ ॥
नसे शास्त्र विद्या कलादीक काही ।
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ॥
तुझे लेकरु ही अहंता मनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ३ ॥
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा ।
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ॥
क्षमेची असे याचना त्वत्पदाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ४ ॥
मला काम क्रोधाधिकी जागविले ।
म्हणोनी समर्था तुला जागविले ॥
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ५ ॥
नको अंत पाहू त्वरे धाव घेई ।
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ॥
अनाथासि आधार तुझा दयाळा ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ६ ॥
कधी गोड वाणी न येई मुखाला ।
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ॥
कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ७ ॥
मला एवढी घाल भीक्षा समर्था ।
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ॥
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ८ ॥
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥