श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: ‘भिऊ नकोस’चा कालातीत अढळ विश्वास देत अशक्यही शक्य करणारे स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:07 IST2025-03-30T16:07:22+5:302025-03-30T16:07:50+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या अगाध, असीम, अथांग अन् दैवी चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: ‘भिऊ नकोस’चा कालातीत अढळ विश्वास देत अशक्यही शक्य करणारे स्वामी
Shree Swami Samarth Prakat Din 2025: चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा दिलासादायक आणि सकारात्मक गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. आजही स्वामींची प्रचिती येते, असा अनुभव अनेक जण सांगताना दिसतात. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नृसिंह भान असून, श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे, असे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सूचवतात. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या अगाध, असीम, अथांग अन् दैवी चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...
इ.स. १४५९ मध्ये माघ वद्य प्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त करून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या कालावधीत मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ उभे केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट झाले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत.
संपूर्ण भारतभर भ्रमंती आणि अक्कलकोट येथे आगमन
आपल्या हातून महापुरुष जखमी झाला, या विचाराने उद्धवाला अत्यंत दुःख झाले व भय वाटू लागले. पण, भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकाता येथे गेले. महाकाली मातेचे दर्शन घेऊन काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले, असे सांगितले जाते. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.
स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोट तीर्थक्षेत्र
स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. स्वामींनी लोकांना भक्तीमार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले.
गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा महाराज यांना दीक्षा
इ. स. १८७५ च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता; तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी स्वामी समर्थांनी फडके यांना 'सध्या लढायची वेळ नाही', असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थांनीच शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा महाराज यांना दीक्षा दिल्याची मान्यता आहे. तसेच अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू संस्कृतीनुसार, घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, असे सांगितले जाते.
आजघडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून, अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींचे स्मरण करीत असतात. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे, ब्रह्मांनायक स्वामी समर्थ ३० एप्रिल १८७८ रोजी समाधीस्त झाले.
॥ श्री स्वामी समर्थ ॥