श्रीराम आख्यान: यथा राजा, तथा प्रजा! रामराज्य म्हणजे सोनेरी पान, जनतेची सुख-समृद्धी हे तर प्रभूंचंच वरदान
By देवेश फडके | Published: April 16, 2024 01:38 PM2024-04-16T13:38:47+5:302024-04-16T13:42:23+5:30
Shriram Aakhyan: रामराज्य हे कायमच आदर्श राहिले आहे. कलियुगातही रामराज्य यावे, असे अनेकांना वाटते.
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥
Shriram Aakhyan: रामायण म्हणजे आदर्शांची प्रतिकृती आहे. सर्व मानवी जीवनात राम भरून राहिला आहे. भेटल्यावर ‘राम-राम’, शेवटचा श्वास घेतल्यावर ‘राम’ आणि नंतरही ‘राम’. एखाद्या आयुष्यातील निरर्थकपणा दाखवण्यासाठीही ‘त्याच्या जीवनात राम नाही’, असेच म्हटले जाते. ‘रमन्ते योगिन: अस्मिन् इति राम:।’, ही राम संज्ञेची व्युत्पत्ति, व्याख्या सार्थ आहे, असे सांगितले जाते.
रामायण घडून दोन युगे लोटली, लाखो वर्षांचा काळ गेला. तरी आजही रामराज्याचीच संकल्पना मांडली जाते. किंबहुना रामराज्य यावे, अशी आस धरली जाते. श्रीरामांनी अनेकविध आदर्श समाजाला घालून दिले. स्वतः श्रीराम त्या आदर्शांवर जगले, लोकांना जगवले आणि आदर्शांवर चालण्याचा मार्गही दाखवला. त्यापैकीच एक म्हणजे रामराज्य. रावणवधानंतर १४ वर्षांनी श्रीराम अयोध्येला परतल्यानंतर राज्याभिषेक करण्यात आला. तेव्हापासूनच रामराज्य सुरू झाले. श्रीरामांप्रमाणे रामराज्य एक आदर्श होते. आजच्या काळातही रामराज्य लोकांना हवेहवेसे वाटते. रामराज्याची आसक्ती अजूनही लोकांच्या मनात दिसते. खुद्द श्रीरामांनी स्थापन केलेले रामराज्य पुढे हजारो वर्षे पुढील पिढ्यांनी राखले, असे म्हटले जाते.
वाल्मिकी रामायणात भरत रामराज्याचा उल्लेख करतानाचे काही प्रसंग देण्यात आले आहेत. भरत श्रीरामांना सांगतो की, राघवा! तुझा राज्याभिषेक होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता सर्वजण निरोगी दिसत आहेत. केवळ मानवावर नव्हे, तर प्राण्यांवरही रामराज्याचा प्रभाव दिसत आहे. विविध जीव आणि प्राणीही सुखात असल्याचे प्रतीत होते आहे. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मेघांतून अमृतासारखा वर्षाव होत आहे. वारा अशा प्रकारे वाहतो की, त्याचा स्पर्श आल्हाददायक आणि आनंददायी वाटतो. असा प्रभावशाली राजा दीर्घकाळ लाभावा, अशी कामना प्रजा करत आहे, असे वर्णन रामराज्याला सुरुवात झाल्यानंतर भरताने केल्याचे म्हटले जात आहे. १९३० च्या दरम्यान महात्मा गांधी यांनी ‘रामराज्य आणि स्वराज्य’ या विषयावर लेख लिहिला होता, असे म्हणतात.
गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये रामराज्य याविषयी विस्तृत विवेचन केले आहे. याबाबत बोलताना कुमार विश्वास सांगतात की, श्रीराम भरताला विचारतात की, राज्याची कररचना कशा प्रकारे केली जात आहे? भरताने रामाला कररचनेच्या व्यवस्थेची परिकल्पना सांगितली. यावर श्रीराम म्हणाले की, आपण सूर्यवंशी आहोत. ज्या प्रकारे सूर्य कर घेतो, त्या प्रमाणे आपली कररचना आणि कर व्यवस्था असायला हवी. ज्या प्रमाणे सूर्य नदी, नाले, तलाव, समुद्र यातून पाणी शोषून घेतो, जिथे जिथे पाणी आहे, त्यातील काही भाग सूर्य आपल्या तेजाने शोषून घेत असतो. मात्र, हेच पाणी पावसाच्या स्वरुपात परत करतो. याचाच अर्थ राजाला सूर्याप्रमाणे असले पाहिजे. जेव्हा लोकांकडून कर आकारला जाईल, तेव्हा त्यांना कळणारही नाही, इतक्या सूक्ष्म स्वरुपात कराची आकारणी करायला हवी. ज्याची झळ जनतेला कधीही बसणार नाही. मात्र, करस्वरुपात मिळालेला पैसा, धन किंवा अन्य कोणतीही गोष्ट परत करण्याची वेळ येते किंवा राज्याच्या कल्याणासाठी याचा वापर करायचा असेल, तेव्हा दुपटीने नाही, तर अनेकपटींनी ते जनतेलाच परत दिले पाहिजे. जे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडून अधिक कर आकारला गेला पाहिजे आणि जे गरीब आहेत, त्यांच्याकडून करच आकारला जाऊ नये.
रामराज्यात कर आकारणी करताना, हिरे, माणिक-मोती यांच्यावर अधिक कर आकारण्यात आला. जर तुमची अधिक कमाई होत असेल, तर तुम्हाला अधिक कर लागणार. उलट, रामाने गरिबांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. गरिबांसाठी जल, अनाज खुले केले. रामराज्याची संकल्पना करताना श्रीरामांनी अशा अनेक गोष्टी केल्याचे रामचरितमानससह अन्य ग्रथांत नमूद केल्याचे आढळून येते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या दृष्टिकोनातून पहिल्यास, श्रीरामांच्या नेतृत्वातील राज्याला आदर्श राज्य म्हटले गेले आहे. रामराज्याचाच अर्थ एक आदर्श राज्य, सुशासित राज्य असाच आहे. रामकथेत रामराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. रामकथेच्या लोकप्रियतेचे आणि मान्यतेचे महत्त्वाचे कारण म्हणजे रामराज्याची संकल्पना. श्रीराम नक्कीच एक जागरूक शासक होते. श्रीरामांनी स्वतःच्या कर्तृत्वामुळे प्रजेला कुटुंब, समाज आणि देशाचे चांगले नागरिक बनण्याची प्रेरणा दिली, असे सांगतात.
वाल्मिकी रामायणात तीन ठिकाणी रामराज्याचा उल्लेख येतो. सर्वप्रथम बालकांड या भागात, दुसऱ्यांचा युद्धकांड भागात आणि तिसऱ्यांदा उत्तरकांड या भागात रामराज्य संकल्पना मांडली गेली आहे. रामराज्यात प्रत्येकजण आनंदी असतो, प्रत्येकजण कर्तव्यदक्ष असतो, प्रत्येकाला दीर्घायुष्य लाभते, प्रत्येकाला वैवाहिक प्रेम असते, निसर्ग उदार असतो आणि प्रत्येकामध्ये नैतिक श्रेष्ठता दिसून येते, ही रामराज्याची सहा वैशिष्ट्ये सांगितली जातात. श्रीरामांनी अनेक वर्षे राज्य केले. श्रीरामांच्या पुढील पिढीने रामराज्याची संकल्पना अबाधित ठेवल्याचे म्हटले जाते.
पुढे कुश आणि लव यांनी प्रत्यक्ष श्रीरामांसमोर रामचरित्र सादर केले. हे पाहून श्रीरामांना एकीकडे आश्चर्यही वाटले आणि दुसरीकडे श्रीराम अशा प्रकारे रामकथा सादर केल्याबाबत प्रसन्नही झाले. पुढे ही दोन सुकुमार बाळे आपलीच अपत्ये आहेत, हे समजल्यावर केवळ रामांना नाही, तर घरच्यांना आणि अयोध्येच्या प्रजेला अत्यानंद होतो. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही पुत्ररत्न प्राप्त झाले. या सर्वांना रामराज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या भागांमध्ये पाठवण्यात आले आणि त्यांचे राज्याभिषेक करण्यात आले, असे सांगितले जाते.
भरताला दोन पुत्र होते, तार्क्ष आणि पुष्कर. लक्ष्मणाला दोन पुत्र होते, चित्रांगद आणि चंद्रकेतू. शत्रुघ्नालाही दोन पुत्र होते, सुबाहू आणि शूरसेन. पूर्वी मथुरेचे नाव शूरसेन होते. लव आणि कुश हे राम आणि सीतेचे पुत्र होते. दक्षिण कोसल प्रदेशात कुश आणि उत्तर कोसल प्रदेशात लव यांचा राज्याभिषेक करण्यात आला. श्रीरामाच्या काळातही कोसल राज्याची विभागणी उत्तर कोसल आणि दक्षिण कोसल अशीच होती. कालिदासांच्या रघुवंशानुसार, रामाने शरावतीचे राज्य त्याचा मुलगा लव याला आणि कुशावतीचे राज्य कुशला दिले होते. जर आपण शरावतीला श्रावस्ती मानले तर नक्कीच लवचे राज्य उत्तरेत होते आणि कुशचे राज्य दक्षिण कोसलात होते. कुशची राजधानी कुशावती ही आजच्या बिलासपूर जिल्ह्यातील मानली जाते. कोसल हे श्रीरामांची आई कौसल्येचे जन्मस्थान मानले जाते. काही ऐतिहासिक मान्यतांनुसार, लवने लवपुरी शहराची स्थापना केली होती, जे सध्या पाकिस्तानमधील लाहोर आहे. येथील एका किल्ल्यात लव याचे मंदिर असल्याचे म्हटले जाते. लवपुरीनंतर लौहपुरी म्हणून हा भाग ओळखला जाऊ लागला. आग्नेय आशियाई देश लाओस आणि थाई शहर लोबपुरी या दोन्ही ठिकाणांची नावे त्यांच्या नावावर आहेत, असे म्हटले जाते. लव आणि कुश यांपैकी कुश यांचा वंश पुढे अधिक वाढला, अशी मान्यता आहे. कुशवाह, मौर्य, सैनी आणि शाक्य पंथांची स्थापना कुश वंशातून झाली, असे मानले जाते.
रामराज्य हे विस्तृत आणि मोठ्या प्रमाणावर पसरलेले होते, असे मानले जाते. कलियुगातही रामराज्य यावे, असे अनेकांचे स्वप्न आहे. याचे कारण रामराज्य हे कायमच आदर्श राहिले आहे. तशी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, करव्यवस्था, नीती, धोरणे, कायदा व्यवस्था, सुशासन असावे, असे अनेकांना वाटते. मात्र, कलियुगातील एकंदरीत परिस्थिती पाहता, रामराज्य यावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासून करायला हवी. रामचरित्र अंगी बाणवायला हवे. मर्यादांचे पालन करायला हवे. कसे जगावे, कसा विचार करावा, काय विचार करावा, याचे आदर्श श्रीरामांनी घालून दिले आहेत.
आजच्या काळात श्रीरामांप्रमाणे वर्तन, व्यवहार शक्य नाही, असे वाटत असले, तरी त्याच्याशी सुसंगत, त्याजवळ जाणारा वर्तन, व्यवहार आचरण्याचा संकल्प करून त्याचा ध्यास घ्यावा. चुकीचे घडताना न्याय आणि योग्य पद्धतीने त्याबाबत आवाज उठवणे, त्यासाठी लागेल ती मदत करणे, समाजात वावरताना आपले वर्तन मर्यादित ठेवणे, कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे, आपल्या हातून कायदा मोडणार नाही, नियम मोडले जाणार नाहीत, याची दक्षता घेणे, योग्यवेळी कर भरणे, आपल्या कुटुंबापासूनच अनेक धोरणे, नीती यांची सुरुवात करणे, सुशासनासाठी शासनाला, राज्यकर्त्यांना आपापल्यापरिने सहाय्य करणे, अशा अनेक गोष्टी स्वतःपासून सुरू करत, कुटुंब, समाज, देशात रुजवत गेल्यास एक दिवस रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. परंतु, त्यासाठी प्रचंड मेहनत, त्यागभावना, समर्पण, संघर्ष, संयमीवृत्ती, प्रयत्नांची पराकाष्टा, बंधुभाव, एकजुटीने पुढे जाणे, सत्याच्या बाजूने राहणे अशा अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे, त्याचे भान, जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शेवटी प्रत्यक्ष देव असून, श्रीरामांना भोग चुकले नाहीत, तिथे आपल्यासारख्या अतिसामान्य मनुष्यांची काय गत?
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
- देवेश फडके.