श्रीराम आख्यान: तू बंधू, तूच सखा... मित्र जोडणारा श्रीराम, मैत्री जपणारा सुग्रीव; ही दोस्ती तुटायची नाय!
By देवेश फडके | Published: April 12, 2024 07:36 AM2024-04-12T07:36:53+5:302024-04-12T07:40:46+5:30
Shriram Aakhyan: सुग्रीवाची मोलाची मदत आणि मैत्री श्रीराम कधीही विसरले नाहीत. मैत्री एवढी घट्ट झाली की, श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात बंधुत्वाचे नाते निर्माण झाले.
Shriram Aakhyan: साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला। सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला॥, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर म्हणजेच गदिमा यांनी गीतरामायण साकारताना सुग्रीव आणि रामाच्या भेटीवर अप्रतिम रचना केली आहे. सीताशोधार्थ निघालेले प्रभू श्रीराम ऋष्यमुख पर्वताजवळ आले. पर्वतावर सुग्रीव आपल्या सहकाऱ्यांसह बसले होते. दूरूनच सुग्रीवाने राम आणि लक्ष्मणांना येताना पाहिले. तेव्हा वालीनेच या दोघांना पाठवले असणार, असा समज सुग्रीवाचा झाला. सुग्रीवाने हनुमंतांना श्रीराम आणि लक्ष्मण यांची चौकशी करण्यास पाठवले. हनुमंतांना श्रीराम आणि लक्ष्मण यांची खरी ओळख पटली आणि ते त्यांना सुग्रीवाकडे घेऊन आले.
सुग्रीव किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. सूर्याचा पुत्र व वानरराज वालीचा धाकटा भाऊ होता. एका गैरसमजातून वाली व सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले. वालीने सुग्रीवाला किष्किंधेतून तडीपार केले. एवढेच नव्हे तर सुग्रीवाची पत्नी रुमेचे हरण केले. म्हणूनच सुग्रीव आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ऋष्यमुख पर्वतावर वास्तव्य करत होता. हनुमंतांनी सुग्रीवाशी भेट करून दिल्यानंतर अग्नीसाक्षीने सुग्रीवाने श्रीरामांची मैत्री स्वीकारून सीतामाईला शोधून काढण्याचे वचन दिले. सुग्रीवाने रामाला आपण इथे का आलो, वालीचा गैरसमज, वालीशी झालेले भांडण, वालीने राज्यातून हाकलवून देणे, वालीने रुमेचे हरण करणे, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तिथेच वालीचा वध करून श्रीरामांनी रुमेला सोडवावे, अशी विनंती केली. तसेच त्यानंतर सीताशोधार्थ सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
वालीशी युद्ध करून त्याचा वध करणे सोपे नव्हते. कारण वालीशी जो युद्ध करेल, त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल, असे वरदान वालीला होते. त्यामुळे वालीला सुग्रीवानेच आव्हान द्यावे आणि समरांगणी बोलवावे, युद्ध करावे, असे ठरले. मात्र, सुग्रीव आणि वाली यांच्यात एवढे साम्य होते की, युद्धाला उभे राहिल्यावर नेमका सुग्रीव कोण आणि वाली कोण हेच समजेना. सुग्रीवाला वालीने चांगलेच बदडून काढले. पहिला दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झाल्यावर पुन्हा तीच अवस्था झाली. तेवढ्यात हनुमंतांनी आजूबाजूची पाने, फुले गोळा करून एक माळ केली आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातली. त्यानंतर काही मिनिटातच रामाने एकच बाण सोडला आणि वालीचा वध केला. सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केले. मात्र, युवराज वालीपुत्र अंगदाला करावे, अशी सूचना केली.
रामबाण वालीवर चालल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी वाली आणि रामाचा संवाद झाल्याचे सांगितले जाते. या संवादातून नैतिकता आणि नीतीमत्ता यांचा संगम झाल्याचे पाहायला मिळते, असे सांगतात. वालीने रामाला विचारले, राम, तू राजा आहेस. मला तू अशा तऱ्हेने मारलेस हे न्याय्य आहे का? यावर राम उत्तरला की, सुग्रीवाची पत्नी रुमेचे तू हरण केलेस. तिच्याशी गैरवर्तन केले. अशा पद्धतीने तुझा वध करून मला कोणतेही पाप लागणार नाही. वाली पुढे विचारतो की, रामा, तू सीताशोधार्थ माझा बंधु सुग्रीवाची मदत घेतलीस. तुला त्याची मदत हवी असल्यामुळे तू माझा वध करण्यास तयार झालास. रामा, तू बुद्धिमान नाहीस. माझा बंधु सुग्रीव दुर्बल आहे. मी त्याच्यावर अनेक वेळा वार केला आहे. माझे नाव घेताच तो दूर पळून जातो. अशा भ्याड सुग्रीवाऐवजी तू माझी मदत घ्यायला हवी होतीस. मी अधिक शक्तिशाली आहे. वास्तविक तुझा शत्रू रावण यालाही माझे भय वाटते. माझ्या शक्तीची कल्पना असल्यामुळे रावणाला माझे भय वाटते. तू माझी मदत मागायला हवी होतीस. त्यावर राम म्हणाला की, सुग्रीव आणि मी समदुःखी आहोत. आम्हा दोघांच्या पत्नींचे हरण झाले आणि ज्याने हरण केले, त्याच्याशीच कसा मैत्रीचा हात पुढे करणार. म्हणून त्याच्याशी मैत्री केली. तू अधिक शक्तिशाली आहेस, हे मला माहिती नाही, असे समजू नकोस.
त्यानंतर वालीने झाडाच्या मागे लपून रामबाण चालवण्याबाबत रामाला विचारणा केली. तू माझ्यासमोर येऊन का मारले नाहीस? तू लपून का बसलास? ह्याला शौर्य म्हणायचे का? ते सौजन्य आहे का? असे अनेक प्रश्न विचारले. यावर, हे पाहा वाली, तुझ्या तपाचे फळ म्हणून तुझ्या गळ्यात असलेली मोत्याची माळ ब्रह्मदेवाने तुला दिली आहे हे मी जाणतो. तुझ्या गळ्यात ही माळ आहे, तोपर्यंत कोणीही तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी युद्ध करू शकत नाही, हेही मला माहिती आहे. ब्रह्मदेवाने तुला दिलेल्या वरदानाचा मान राखण्यासाठी झाडाच्या मागून बाण मारणे भाग पडले. मला युद्धधर्माविषयी एवढेही ज्ञान नाही असा त्याचा अर्थ नाही, असे राम उत्तरला.
राज्यपद प्राप्त झाल्यानंतर राजविलासात सुग्रीव रममाण झाला. रामकार्याचा विसर पडला. त्यामुळे लक्ष्मणाने खडसावून सुग्रीवाला रामकार्याची आठवण करून दिली. सुग्रीवाचे डोळे खाडकन उघडले. अतिशय तत्परतेने काही तुकड्यांमध्ये सुग्रीवाने आपल्या सहकाऱ्यांना चारही दिशांना पाठवले. तसेच सर्व वानरगणांना निमंत्रणे पाठवली. अगदी कमी वेळात कोट्यवधी वानरगण सुग्रीवाला येऊन मिळाले. श्रीरामांनी हनुमंतांकडे आपल्या बोटातील एक अंगठी दिली. कारण हनुमंतांना सीतेचा शोध लागेल, असा विश्वास रामाला वाटला. हनुमंत, नील, अंगद आणि जांबूवंत यांच्या पथकाला संपातीकडून सीतेचा ठावठिकाणा समजला. त्यानंतर हनुमंतांनी लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला. त्यांना रामाचा दूत असल्याची ओळख पटावी म्हणून रामाने दिलेली अंगठी दाखवली. सीतेनेही तिच्याकडील एक गोष्ट हनुमंतांना दिली. हनुमान रामाला येऊन भेटला आणि सीता नेमकी कुठे हे समजल्यावर कोट्यवधी वानरांची सेना दक्षिणेला निघाली.
पुढे सेतू बांधून रावणवधापर्यंत सुग्रीवाने श्रीरामांना पडेल ती सर्व मदत केली. सर्वतोपरी सहकार्य केले. सुग्रीवाने दिलेले वचन पूर्ण केले. ही मोलाची मदत लक्षात ठेवून श्रीरामांनी सुग्रीवाला आपला पाचवा भाऊच मानला. अयोध्येत परतल्यानंतर सुग्रीव, अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा यथोचित सत्कार केला. सुग्रीव पुन्हा आपल्या किष्किंधा राज्यात परतला. परंतु, हनुमान पुढे सदैव श्रीरामांसोबत राहिला. श्रीरामावताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमानाने श्रीरामांची साथ सोडली नाही. रामराज्यात रामांना हनुमानाची मोठी मदत झाली, असे सांगितले जाते.
१४ वर्षांचा वनवास संपवून जेव्हा श्रीराम अयोध्येत परतत आहेत, असा निरोप हनुमानाने भरताला दिला. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई परत येत आहेत, ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. अयोध्यावासीयांमध्ये आनंदाचे नवचैतन्य प्रकटले. भरत रामाचे स्वागत करण्याच्या तयारीला लागला. शत्रुघ्नाने सर्व अयोध्या सजवून टाकली. यानंतर राज्याभिषेकावेळेची एक कथा सांगितली जाते. ही कथा कुमार विश्वास यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती. त्यातून श्रीरामांनी मैत्री निभावणे म्हणजे काय, याचा दाखला दिला होता. राज्याभिषेक सोहळ्यात कोणाकोणाला निमंत्रणे द्यायची, यासाठी भरत श्रीरामांजवळ आला. वनवासात असताना अन्य कोणाशी मैत्री झाली होती का, कोणाला बोलावायचे राहून जात नाही ना, याची खात्री भरताला करून घ्यायची होती. तेव्हा वनवासात असताना इथे आजूबाजूला काय घडले, कोण राजा झाले, काय झाले मला याची माहिती नाही. भरत निघून गेला.
रात्री झोप लागत असताना रामाला अचानक जाग आली. सीतेने आश्चर्याने याबाबत विचारले. तेव्हा श्रीराम उत्तरले की, तत्काळ भरताची भेट घेणे आवश्यक आहे. नंदीग्रामी जाऊन रात्री भरताला उठवले आणि म्हणाले की, आणखी एक जण मित्र बनला होता. त्याचे उपकार माझ्यावर आहेत. माझा विशेष निमंत्रित म्हणून तू त्याला बोलवावे, अशी माझी इच्छा आहे. तो विशेष निमंत्रित मित्र म्हणजे केवट. केवट यांनी रामाला गंगा नदी पार करून दिली होती. जेव्हा केवटाने रामाला गंगापार करून दिले. तेव्हा रामाकडे त्या केवटाला देण्यासाठी काही नव्हते. भारतेश्वरी सीतेला रामाच्या मनाची अवस्था समजली. लगेच तिने तिच्याजवळ असलेली हिरेजडित सोन्याची अंगठी काढून रामापुढे ठेवली. रामाने ती अंगठी केवटाला दिली. मात्र, केवटाने ती नाकारली आणि रामाला म्हणाला की, आपले काम एकच आहे. रामाने आश्चर्याने याबाबत विचारले. तेव्हा केवट उत्तरला की, मी लोकांना गंगा पार करून देतो. तुम्ही मनुष्याला भवसागर पार करण्यास सहाय्य करता. श्रीराम कधीही एक वाक्य दोनदा बोलत नाही, असे म्हटले जाते. तेव्हा श्रीराम केवटाला म्हणाले की, अरे, तुझे हे ऋण कायम माझ्यावर राहील. यावर केवट म्हणाला की, याची परतफेड करण्याची संधी देईन. श्रीराम म्हणाले की, ती संधी कधी मिळेल. केवट म्हणाला की, मी तुम्हाला गंगा पार करण्यास मदत केली. माझा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा भवसागर पार करण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही माझी मदत करा. हिशोब पूर्ण होईल. ही कथा तुलसीदास यांच्या रामचरितमानसमध्ये आल्याचे सांगितले जाते.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
- देवेश फडके.