Shrvan Purnima 2023: नारळी पौर्णिमेला श्रीफळाला एवढे महत्त्व का? समुद्रालाही तोच अर्पण करण्यामागे आहे कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:30 PM2023-08-29T12:30:11+5:302023-08-29T12:30:40+5:30

Narali Purnima 2023: आपले रक्षाबंधन हीच कोळी बांधवांसाठी व आपल्यासाठीसुद्धा नारळी पौर्णिमा; या दिवशी श्रीफळाचे अर्थात नारळाचे महत्त्व का आहे ते जाणून घेऊ. 

Shrvan Purnima 2023: Why does coconut so much importance on Narali Purnima? It also offer to the sea because... | Shrvan Purnima 2023: नारळी पौर्णिमेला श्रीफळाला एवढे महत्त्व का? समुद्रालाही तोच अर्पण करण्यामागे आहे कारण... 

Shrvan Purnima 2023: नारळी पौर्णिमेला श्रीफळाला एवढे महत्त्व का? समुद्रालाही तोच अर्पण करण्यामागे आहे कारण... 

googlenewsNext

यंदा ३० ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे. यादिवशी आपले कोळीबांधव समुद्राची पूजा करतात आणि त्याला श्रीफळ अर्पण करून ऋणनिर्देश व्यक्त करतात. परंतु ही कृतार्थता कशाबद्दल? ते सविस्तर जाणून घेऊ. 

नदी वहावत जाते परंतु समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. आणि यदाकदाचित त्याने आपली मर्यादा ओलांडली तर प्रलय, त्सुनामी आलीच म्हणून समजा. खवळलेल्या समुद्राकडे पाहून आपल्याल धडकी भरते, परंतु कोळीबांधव त्याला आपला मायबाप मानून खुशाल स्वत:ला झोकून देत लाटांवर स्वार होतात. कारण तोच त्यांचा पोशिंदा असतो. समुद्री मेवा त्यांना पुरवतो. तोच आपल्यापर्यंत पोहोचतो. अशा सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2023)

आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले  जाते आणि आमचा सांभाळ कर, पोटापाण्याचा प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना केली जाते. 

या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळीबांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण `उत्सव' म्हणून साजरा करतात. कोळीवाडयातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष नाचत गात आनंदाने मिरवणूक काढतात. समुदायानेच आपापला नारळ समुद्रात अर्पण करतात. धंद्याला बरकत यावी आणि पुढचे वर्ष समुद्राने आपले रक्षण करावे म्हणून प्रार्थना करतात. नंतरही बराच वेळ सर्व समुद्रकिनारे आणि कोळीवाडे नाचत बागडत असतात. या दिवशी नारळ घातलेला गोड पदार्थ केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून बंद ठेवलेले व्यवसाय या दिवशी पुन्हा सुरू केले जातात. 

यादिवशी अनेक घरांमध्ये नारळी भात किंवा नारळाच्या वड्यांचा मुख्य बेत केला जातो. कारण याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. आवडत्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधली जाते आणि त्याची किर्ती सागरासारखी अमर्याद पसरू देत अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. 

सणांचे हे सुंदर रूप पाहिले, की आपल्या संस्कृतीचा आणि पूर्वजांचा हेवा वाटतो. त्यांच्या दूरदृष्टीची कमाल वाटते. नर्मदेला साडी नेसवणे असो नाहीतर समुद्राला नारळ अर्पण करणे असो, निसर्गाला कवेत घेण्याचा, सलगी साधण्याचा, ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न किती सुंदर आहे. निसर्गामुळे आपले अस्तित्त्व टिकून आहे अन्यथा नदी, डोंगर, वृक्ष, फळं, फुलं, आकाश, समुद्र, पर्वतरांगा यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. याचे भान राहावे, यासाठीच धर्मशास्त्राने या सणांची सांगड चपखलपणे निसर्गाशी घालून दिली आहे. 

Web Title: Shrvan Purnima 2023: Why does coconut so much importance on Narali Purnima? It also offer to the sea because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.