नवस पूर्ण होताच भक्तानं विंध्यवासनी मंदिराला बसवला तब्बल १०१ किलो चांदीचा दरवाजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:38 AM2022-04-29T08:38:18+5:302022-04-29T08:42:15+5:30
मिर्जापूरच्या विंध्याचल स्थित प्रसिद्ध माँ विंध्यवासनी मंदिरात एका भक्तानं त्याचा नवस पूर्ण होताच तब्बल १०१ किलो चांदीनं बनवलेला दरवाजा अर्पण केला आहे.
मिर्जापूर-
मिर्जापूरच्या विंध्याचल स्थित प्रसिद्ध माँ विंध्यवासनी मंदिरात एका भक्तानं त्याचा नवस पूर्ण होताच तब्बल १०१ किलो चांदीनं बनवलेला दरवाजा अर्पण केला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा आता पूर्णपणे चांदीचा करण्यात आला असून मंत्रोच्चार करुन त्याची पूजाही करण्यात आली आहे. या दरवाजाची एकूण किंमत जवळपास ८० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
पाच फूट लांब आणि दोन फूट रुंदीचा दरवाजा असून तो खास राजस्थान येथे बनविण्यात आला आहे. दरवाजावर चांदीचा लेप लावण्यासाठी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील पाच कारागीरांना अथक परिश्रमातून दरवाजा साकार केला. मंदिरात आता ज्या ठिकाणी चांदीचा दरवाजा बसविण्यात आला आहे त्याठिकाणी याआधी पितळेचा दरवाजा होता.
चांदीचा दरवाजा अर्पण करणारा भक्त रांची येथील रहिवासी असून त्यानं माँ विंध्यवासिनी देवीकडे केलेला नवस फेडला. यावेळी माता विंध्यवासिनी मंदिरात खास पूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं. तसंच भंडारा देखील ठेवण्यात आला होता. भक्त संजय चौधरी यांनी सांगितलं की ते जवळपास २५ वर्षांपासून रांचीहून विंध्याचल येथे भेट देत आहेत. संजय दोन्ही नवरात्र उत्सवात सहकुटुंब माता विंध्यवासिनी मंदिरात दर्शनासाठी येतात.
नवरात्री काळात त्यांनी देवीला नवस सांगितला होता. यात त्यांनी मनोकामना पूर्ण झाल्यास मंदिराला चांदीचा दरवाजा अर्पण करेन असा नवस सांगितला होता. देवीच्या कृपेनं आमची इच्छा पूर्ण झाली आणि केलेला नवस मी फेडला, असं संजय सांगतात.
महत्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बिहारच्या एका मंत्र्यानं विंध्यवासिनी मातेला एक किलो सोन्याचं मुकूट आणि पाऊल अर्पण केलं होतं. याची किंमत जवळपास ५० लाख रुपये इतकी होती. विंध्यवासिनी मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती विंध्यवासिनी देवीची आहे.