Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:51 AM2024-05-15T10:51:41+5:302024-05-15T10:52:08+5:30
Sita Navami 2024: सीता नवमीला उपास करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. तसे केल्याने सोळा श्रेष्ठ दानांचे पुण्य मिळते असं म्हणतात, अधिक जाणून घ्या!
दरवर्षी वैशाख शुक्ल नवमी ही सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सीता माई राजा जनकाला मिळाली आणि त्यांनी तिला आपली कन्या म्हणून स्वीकारली, तोच हा दिवस!
हिंदू कॅलेंडरनुसार, सीता नवमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा १६ मे रोजी गुरुवारी ही तिथी येत आहे. या दिवशी सीता माई जनक राजाला सापडली. त्यामुळे ही तिथी सीता नवमी तसेच जानकी नवमी म्हणून ओळखली जाते. आजच्या दिवशी उपास केल्याने सोळा मोठ्या दानांचे फळ मिळते असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया सीता नवमी का साजरी केली जाते आणि माता सीतेशी संबंधित पौराणिक कथा काय आहे?
भगवान रामाला विष्णूचा अवतार मानले जाते. तसेच माता सीतेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते. वाल्मिकी रामायणात सीता माता पृथ्वीवर अवतरल्याचा उल्लेख आहे. एवढेच नाही तर भूमिकन्या सीता अशीही तिची ओळख आहे. कथा अशी आहे, की मिथिला देशात एकदा भीषण दुष्काळ पडला होता. जनक हा त्या नगरीचा राजा होता. दुष्काळामुळे मिथिलेचे लोक उपासमारीने मरू लागले. हे पाहून राजा जनक अस्वस्थ झाला.
त्यांनी एका महान ऋषींना या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा उपाय विचारला. ऋषींनी राजा जनकाला यज्ञ करण्यास व यज्ञभूमी नांगरण्यास सांगितले. जनकाने त्यांची आज्ञा प्रमाण मानून यज्ञाची पूर्ण तयारी केली आणि यज्ञ भूमी नांगरण्यास सुरुवात केली. त्यावेळेस नांगराचे टोक जमिनीत गेल्यावर काहीतरी वाजल्याचा आवाज आला. जनकाने माती बाजूला केली तर तिथे जमिनीतून एक आकर्षक पेटी बाहेर काढली. राजाने पेटी उघडली तेव्हा त्यात एक नवजात मुलगी दिसली. राजा जनकाला मूलबाळ नव्हते. संतती होण्यासाठी त्याने अनेक नवसायास केले होते. त्या गोंडस बालिकेला आपण दत्तक घ्यावे असा मनोदय जनकाने ऋषींजवळ व्यक्त केला. ऋषींनीदेखील हा दैवी प्रसाद आहे असे समजून तिचे पालन कर असे सांगितले व आशीर्वाद दिला.
नांगराने नांगरलेल्या जमिनीला सीता म्हणतात, व ही बालिका अशाच नांगरलेल्या जमिनीतून मिळाली, म्हणून राजा जनकाने मुलीचे नाव सीता ठेवले. तसेच जनकाची कन्या अशी ओळख मिळाल्याने ती जानकी म्हणूनही ओळखली जाऊ लागली. मिथिलेची राजकुमारी म्हणून मिथिला असेही नाव तिला मिळाले. मात्र सीता हे नाव रूढार्थाने लौकिक पावले. तीच सीता पुढे श्रीरामाची पत्नी झाली.
काही पौराणिक कथांमध्ये, सीता ही लंकापती रावण आणि मंदोदरीची कन्या होती, जी तिच्या मागील जन्मात वेदवती म्हणून ओळखली जात असे, असेही म्हटले जाते.
सीतेच्या आगमनाने मिथिलेवरील दुष्काळाचे संकट टळले, देशात पुनश्च शांती, समृद्धी, सुबत्ता प्रस्थापित झाली म्हणून जनकाने अनेक सोळा प्रकारचे दान धर्म केले आणि संतती प्राप्तीचा आनंद व्यक्त केला. आपणही या दिवशी यथाशक्ती दान करू शकलो तर उत्तमच आहे. परंतु ते शक्य नसेल तर निदान उपास करावा, जेणेकरून सोळा प्रकारच्या मोठ्या दानाचे पुण्य लाभते असे शास्त्रात म्हटले आहे.