छोटेसे झाड आणेल घरात सुख समृद्धीला बहार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:09 PM2021-04-06T13:09:50+5:302021-04-06T13:10:05+5:30
घरातले काही कोनाडे कमी सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या रोपट्यांसाठी राखीव ठेवा. ती जागा तुमच्या घरात सुख समृद्धीची पेरणी करेल.
घर असावे, घरापुढे अंगण असावे, अंगणात तुळस असावी आणि त्यात चिमणी पाखरं बागडावीत, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. एकवेळ गावाकडे या गोष्टीची स्वप्नपूर्ती करता येईल, परंतु शहरात राहून हे स्वप्न पूर्ण करणे कठीण! यावर आपण पर्याय निवडतो टेरेस गार्डनचा! खिडकी किंवा गॅलरीत छोटीशी बाग फुलवून दुधाची तहान ताकावर भागवतो. कधी थकवा जाणवला, तर बागकामात मन रमवतो. परंतु वास्तू शास्त्र सांगते, बाग नेहमी घराबाहेरच का, घरातही फुलवून बघा, त्याचा निश्चित उपयोग होईल. घरातील कार्बन डाय ऑक्सईड शोषला जाऊन प्राणवायूचा पुरवठा होईल. डोळ्यांना हिरवळीचा आनंद मिळेल. घरात वातावरण प्रसन्न राहील आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहील. याशिवाय आणखीही महत्त्वाचे फायदे कोणते पहा-
हॉस्पिटल किंवा खाजगी कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी छोटी छोटी रोपटी ठेवलेली असतात. ती केवळ शोभेसाठी नाही, तर मानवी मनावर त्याचा खूप परिणाम होतो. मन शांत राहते. एवढेच काय तर रागावर देखील नियंत्रण राहते. हेच वातावरण घरात राहावे, यासाठी घरातही फुल झाडाच्या कुंड्या लावाव्यात.
अलीकडे मोठमोठ्या झाडांच्या छोट्या प्रतिकृती अर्थात बोन्साय झाडे देखील मिळतात. त्या सर्वच झाडांना सूर्यप्रकाश लागतोच असे नाही. अशी निवडक झाडे घरात लावली, तर घरातील विषारी वायू शोषले जाऊन घराचे शुद्धीकरण होते.
घरात झाडे लावल्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेक प्रकारच्या रोगांचे निराकरण करण्याची ताकद झाडांमध्ये असते. म्हणून जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहा असे सांगितले जाते. परंतु कामाच्या व्यापामुळे जेव्हा निसर्गात जाणे शक्य नसते, तेव्हा निसर्ग घरात आणणे हा पर्याय त्यावर उचित ठरतो.
झाडे तणाव नियंत्रणाचे देखील काम करतात. ज्यावेळेस खूप थकवा, समस्या जाणवत असेल, अशा वेळी झाडांच्या सान्निध्यात वेळ घालवा. पाच मिनिटात सगळा थकवा दूर झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. म्हणून घरातले काही कोनाडे कमी सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या रोपट्यांसाठी राखीव ठेवा. ती जागा तुमच्या घरात सुख समृद्धीची पेरणी करेल.