...म्हणूनच ९९ च्या चक्रात अडकू नका, नाहीतर १०० पटींचा आनंद गमावून बसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 02:56 PM2021-05-29T14:56:19+5:302021-05-29T14:56:43+5:30

जे आपले आहेत, आपल्या समोर आहेत, आपले जीवलग आहेत, ते आपल्या शतपटीच्या सुखाची शिदोरी आहेत. त्यांना गमावून एकाच्या मागे धावू नका!

So don't get stuck in the cycle of 99 or you will lose 100 times the happiness! | ...म्हणूनच ९९ च्या चक्रात अडकू नका, नाहीतर १०० पटींचा आनंद गमावून बसाल!

...म्हणूनच ९९ च्या चक्रात अडकू नका, नाहीतर १०० पटींचा आनंद गमावून बसाल!

googlenewsNext

एक राजा आपल्या महालाच्या या दालनातून त्या दालनात जात असताना त्याला एक सेवेकरी दिसला. तो छान आनंदात गुणगुणत होता. त्याला आनंदात पाहून राजाला असूया वाटली. तो आपल्या दालनात आला. राणीला म्हणाला, माझ्या राज्यात, माझ्या महालात माझा साधा सेवेकरी आनंदात राहू शकतो, मग माझ्याकडे माझे स्वत:चे राज्य असूनही मी दु:खात का?'

राणी म्हणाली, `कारण तो अजून ९९ च्या चक्रात अडकलेला नाही!'
राजा म्हणाला, `हे कोणते चक्र आहे?'
राणी म्हणाली, `मी एक आखणी करते, त्यानुसार काही दिवसातच हे चक्र काय आहे, याचा उलगडा आपोआप तुम्हाला होईल.'

कामाच्या व्यापात राजा हा प्रसंग विसरून गेला. काही दिवसांनी एकदा महालात प्रवेश करताना राजाला तोच सेवेकरी पुन्हा दिसला. मात्र, तो आनंदात नाही, तर दु:खात दिसत होता. राजाला आश्चर्य वाटले. मध्यंतरी याच्या सुखाचा हेवा आपण करत होतो आणि आता हा आपल्याच रांगेत येऊन बसला. त्याला कुतुहल निर्माण झाले. या प्रश्नाची उकल करावी असे वाटू लागले. तो आपल्या दालनात गेला. राणीची भेट घेतली आणि राणीला हा प्रसंग सांगितला. त्यावर राणी म्हणाली, `त्याचे कारण हेच आहे, की तो सेवेकरी आता ९९ च्या चक्रात अडकला आहे.' 

राजा पुन्हा विचारात पडला. त्यावर राणीने उलगडा केला, `महाराज, मी तुम्हाला म्हटले होते ना, की सेवेकरी आनंदात होता कारण तो ९९ च्या चक्रात अडकला नव्हता, पण आता तो त्या चक्रात अडकला आहे, म्हणून तो दु:खी आहे. आता हे ९९ चे चक्र काय आहे, तेही सांगते.'

'मध्यंतरी तुम्ही राजकीय दौऱ्यावर गेलेले असताना मी माझ्या सेविकेकरवी त्या सेवकाच्या दाराशी भल्या पहाटे ९९ सुवर्ण मोहोरांची थैली ठेववली होती. दार उघडल्यावर त्याच्या बायकोने ती थैली पाहिली. ती आनंदून गेली. तिने नवऱ्याला थैली दाखवली. त्याने मोहरा मोजायला घेतल्या, तर ९९ च निघाल्या. त्याला वाटले, ठेवणाऱ्याने ९९ मोहरा नक्कीच ठेवल्या नसतील. तर किमान १०० मोहरा दान करण्याचे योजले असेल. याचा अर्थ एक मोहोर वाटेत पडली, नाहीतर कोणीतरी चोरली. या विचाराने तो सेवेकरी घराच्या सभोवतालचा परिसर धुंडाळून काढतो. मोहरा देण्याची योग्यता राजपरिवारापैकीच कोणाची तरी असणार म्हणून त्याने राजपथही पालथा घातला. परंतु काही केल्या त्याला १ मोहोर सापडली नाही. आणि मी मुद्दामहून ९९ मोहोराच दिल्या होत्या. त्या १ मोहोरेच्या विवंचनेत तो त्याचे आनंदाचे जगणे गमावून बसला आणि ९९ च्या चक्रात अडकला!'

तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या ९९ च्या चक्रात अडकलो आहोत. एकाच्या मागे धावताना आपण ९९ चांगल्या गोष्टींचा उपभोग नाकारत आहोत. तो एक कमावण्यासाठी सगळी धडपड सुरू आहे. त्यामुळे जमवलेले ९९सुद्धा आपण उपभोगू शकत नाहीये.

बऱ्याचदा बाहेरून एक सुख मिळवण्याच्या नादात घरी असलेले ९९ नव्हे तर शतपटीचे सुख गमावून बसत आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. जे आपले आहेत, आपल्या समोर आहेत, आपले जीवलग आहेत, ते आपल्या शतपटीच्या सुखाची शिदोरी आहेत. त्यांना गमावून एकाच्या मागे धावू नका!
 

Web Title: So don't get stuck in the cycle of 99 or you will lose 100 times the happiness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.