...म्हणून आजही कथाकीर्तनात हनुमंतासाठी पाट ठेवला जातो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:00 AM2021-03-27T08:00:00+5:302021-03-27T02:30:07+5:30

जिथे जिथे रामनाम सुरू असते, तिथे हनुमंत आपोआप येतात.

... so even today the story is told for Hanumanta! | ...म्हणून आजही कथाकीर्तनात हनुमंतासाठी पाट ठेवला जातो!

...म्हणून आजही कथाकीर्तनात हनुमंतासाठी पाट ठेवला जातो!

googlenewsNext

आजही गावाकडे किंवा शहरातही कथाकीर्तन,भजन सोहळा सुरू असेल, तर तिथे एक रिकामा पाट ठेवलेला असतो. तो पाट कोणासाठी असतो माहित आहे का? तो पाट असतो, चिरंजीवी हनुमंतासाठी! तसे का? तर यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते...

चौदा वर्षांचा खडतर वनवास संपवून, रावणाशी युद्ध करून, सगळ्या वानरसेनेला घेऊन प्रभू श्रीरामचंद्र सीता माईसह अयोध्येला परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले. आपल्यासाठी रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला, म्हणून सीता माईला समस्त वानरसेनेला भेटवस्तू द्यावीशी वाटली. रामचंद्रांनी सहमती दिली.

सीता माईने यथाशक्ती प्रत्येकाला आवडेल अशी भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. सीतामाईचा आशीर्वाद समजून सगळी वानरसेना श्रद्धेने रांगेत उभी होती. परंतु त्यात हनुमंत दिसले नाहीत. सीता माईने त्याची चौकशी केली असता, तो कुठल्याशा बागेत फळे खात बसल्याचे कळले. सीता माईला वाटले, त्याचा मान पहिला असताना आपण त्याला भेटवस्तू आधी दिली नाही, याचा राग आला असेल. म्हणून सीता माई स्वत: हनुमंताचा शोध घेत बागेत पोहोचली. सोबत श्रीरामचंद्र होतेच. 

हनुमंताचा अधिकार मोठा, म्हणून भेटवस्तूही मोठी द्यावी, अशा विचाराने सीता माईने आपल्या माहेरहून मिळालेला नवरत्नांचा हार हनुमंताला भेट दिला. हनुमंताने त्याचा स्वीकारही केला. हाराकडे कुतुहलाने पाहिले. सीता माईला वाटले हनुमंताला हार आवडला.

पण काही क्षणांत हनुमंताने हारातली रत्न दाताखाली तोडून पहायला सुरुवात केली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या भेटवस्तूचा केलेला अपमान सीतामाईला सहन झाला नाही. तिने हनुमंताला जाब विचारला. 

हनुमंत म्हणाला, `माई, ज्या वस्तूत राम नाही, त्याचा मला उपयोग नाही.' एवढेच नाही, तर हनुमंताने आपली छाती फाडून आपल्या हृदयातही राम आहे, हे सीतामाईला दाखवून दिले. 

हनुमंताची भक्ती पाहून श्रीरामचंद्र सद्गदित झाले. हनुमंताला म्हणाले, `तुझ्या ऋणातून उतराई होणे मला शक्य नाही, मी तुला काय भेट देणार?'

यावर हनुमंत म्हणाला, 'रामराया, द्यायचाच असेल तर एकच आशीर्वाद द्या, जिथे जिथे तुमचे भजन कीर्तन सुरू असेल, त्याचे श्रवण करण्याची मला संधी द्या.'  चिरंजीवी हनुमंताला श्रीरामचंद्र तथास्तु म्हणाले!

तेव्हापासून अशी श्रद्धा आहे, की जिथे जिथे रामनाम सुरू असते, तिथे हनुमंत आपोआप येतात. त्यांना बसण्यासाठी आसन म्हणून एक पाट मांडून ठेवला जातो.

Web Title: ... so even today the story is told for Hanumanta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.