...म्हणून मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे; सद्गुरूंनी सांगितले कारण
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 8, 2021 10:11 AM2021-02-08T10:11:17+5:302021-02-08T10:14:18+5:30
मासिक पाळीला मासिक धर्म असेही म्हणतात. जो निसर्गाने स्त्रियांना बहाल केला आहे. ते चक्र नियमित सुरू राहिले, तरच तिला मातृत्त्वाचे सौख्य प्राप्त होते. मातृत्त्व हे वरदान असेल, तर मासिक धर्मदेखील वरदानच म्हटले पाहिजे.
विटाळ या शब्दाशी स्त्रियांचा काळानुकाळ लढा सुरू होता आणि तो आजतागायत सुरू आहे. मासिक पाळीच्या चार दिवसात स्त्रियांना बाहेर बसवणे, त्यांचा स्पर्श टाळणे, धार्मिक कार्यात सहभागी करून न घेणे अशा गोष्टी आजही अनेक घरातून पाळल्या जातात. पूर्वी या गोष्टी घडवण्यामागे विशिष्ट कारणे होती, मात्र स्थलकालपरत्वे त्यात बदल न करता आजही त्या चालीरीतींचे अंधानुकरण केले जात आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना अध्यात्मिक व्याख्याते सद्गुरु मार्गदर्शन करतात, 'आताच्या तुलनेत पूर्वीच्या स्त्रियांना अंगमेहनतीची कामे खूप होती.घरकाम, शेतकाम, चूल-मूल असा संसारगाडा रेटत असताना तिला क्षणभराचीही विश्रांती मिळत नसे. माणूस असो नाहीतर यंत्र, त्याला विश्रांती दिली नाही, तर ते बंद पडेल. आताच्या काळात नोकरी करणाऱ्या महिलांना आठवड्याची सुटी असते किंवा प्रसंगी सुटी घेता येते. पूर्वी तशी काहीच सुविधा नव्हती. यावर उपाय म्हणून मासिक पाळीची चार दिवसांची सक्तीची विश्रांती!
स्त्री मुळातच संवेदनशील असते. त्या चार दिवसात ती अति संवेदनशील होते. तिच्यावर बाह्य परिस्थितीचा विपरित परिणाम होऊ नये, म्हणून त्या दिवसात तिला बंद दाराआड ठेवले जात असे. विटाळ हा शब्द त्यातूनच आला. मात्र, ही सुविधा तिच्यावर जाच म्हणून नाही, तर तिच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्रांतीसाठी होती.
पूर्वी मंदिर, शिवालय गावकुसाबाहेर असत. तिथे जंगली श्वापदांची भीती असे. श्वापदांना दूरूनही रक्ताचा वास येतो. अशा स्थितीत स्त्रियांच्या जिवाला धोका नको, म्हणून मासिक पाळीच्या दिवसात त्यांना मंदीरात जाऊ नका असे सांगितले जात असे. तसेच पूर्वी प्रत्येक शिवालयाबाहेर चिंचेचे झाड असे. ते झाड सगळी वाईट ऊर्जा, जीव जिवाणूंना आकर्षून घेत असे. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी तिथे गेल्यास वाईट ऊर्जेचा त्यांच्या शरीरात प्रवेश होईल. तसेच अनावश्यक गोष्टींकडे स्त्रिचे मन आकृष्ट होईल, या विचाराने तिच्यासाठी मंदिराचा प्रवेश निषिद्ध मानला जात असे.
त्या दिवसात स्त्रियांच्या शरीरात अनेक अंतर्गत बदल घडत असतात. शारीरिक ऊर्जेच्या पातळीवर एक चक्र कार्यान्वित होत असते. तिच्या मनस्थितीत अनेक बदल घडत असतात. घटकेत राग, तर घटकेत आनंद, अशी तिची भावावस्था असते. अशा अवस्थेत धार्मिक कार्यात सहभागी होताना तिचे मन रमणार नाही, म्हणून तिला धार्मिक कार्यात सहभागी न होण्याची सूट दिली जात असे. या गोष्टींमागी तर्क समजून न घेता आपण केवळ शास्त्र म्हणून त्याकडे पाहत आलो. मात्र वेळोवेळी आपण शास्त्राची उकल करून घेतली पाहिजे. त्यामुळे जुन्या गोष्टी कालसुसंगत कशा होत्या आणि त्यात कालानुरूप काय बदल केले पाहिजेत, यावर विचार करणे सोपे होईल.
आता परिस्थिती खूप बदलली आहे. आपण शहरात राहतो. गावाकडेही परिस्थिती सुधारली आहे. दळणवळणासाठी तसेच घरकामासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. स्त्रियांचे कष्ट पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहेत. परंतु, आजही त्या दिवसात होणारा शारीरिक त्रास पाहता, स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज असते. ती त्यांना मिळालीच पाहिजे. मात्र, त्यासाठी धार्मिक बंधनांची गरज नाही. कारण मासिक पाळी ही धार्मिक बाब नसून वैज्ञानिक बाब आहे.
मासिक पाळीला मासिक धर्म असेही म्हणतात. जो निसर्गाने स्त्रियांना बहाल केला आहे. ते चक्र नियमित सुरू राहिले, तरच तिला मातृत्त्वाचे सौख्य प्राप्त होते. मातृत्त्व हे वरदान असेल, तर मासिक धर्मदेखील वरदानच म्हटले पाहिजे. त्याकडे विटाळ म्हणून न पाहता, अन्य नैसर्गिक बाबींप्रमाणेच त्याची गणना केली पाहिजे.