Solar Eclipse 2022: 'दे दान सुटे गिऱ्हाण' असं का म्हटलं जातं; ग्रहण संपल्यावर दान का करावं? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 06:03 PM2022-10-25T18:03:16+5:302022-10-25T18:03:40+5:30
Solar Eclipse 2022: दिवाळीच्या दिवसात सूर्यग्रहण लागल्याने मनावर थोडे का होईना मळभ आले, ते दूर करण्यासाठी हा उपाय!
शहरात कमी पण गावाकडे आजही ग्रहण काळ सुटल्यावर गरीब लोक दारोदारी जाऊन दान मागतात. काही लोक त्यांना अन्न, पैसे किंवा कपडे दान करतात. मात्र ग्रहण काळातले अन्न शुद्ध मानले जात नाही, म्हणून अन्नावर तुळशी पत्र ठेवले जाते. ते अन्न दान करू नये. पैसे दिले तरी ते किती पुरणार? म्हणून वस्त्रदानाचा पर्याय निवडला जातो. काही जण तर वस्त्राचा एक धागा आकाशाच्या दिशेने टाकतात आणि ग्रहणकाळातून सुटका झाली म्हणत 'जुनं द्या नवीन घ्या' म्हणत धागा दान करतात. त्यापेक्षा गरजू व्यक्तीला वस्त्र दान केले तर तर सर्वाथाने उचित ठरेल! यात गिऱ्हाण हा शब्द ग्रहण शब्दाचा अपभ्रंश म्हणून उच्चारला जातो.
ग्रहण सुटल्याचा निमित्ताने वस्त्रदान करताना ठराविक निर्बंध स्वतःवर लावून घेणे गरजेचे आहे. ते पुढीलप्रमाणे-
कपड्यांना द्या नवे रूप : थोडे फार फाटलेले कपडे फेकून देण्यापेक्षा रफ़ू करून गरजू लोकांना दान करा. आजच्या काळात अनेक कलाकार आहेत, जे जुन्या फाटलेल्या कपड्यांचे रूप पालटून त्याला नवीन साज देतात. कापडी पिशवी, गोधडी, ओढणी, पायपुसणी, चादर, पडदे असे नानाविध प्रकार जुन्या कपड्यांपासून शिवता येतात.
कपडे नेहमी धुवून द्या: कपडे देण्याआधी ते नेहमी धुवून नीट घडी करून मगच दान करा. कपड्यांमुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ नये, यासाठी कपडे धुवून वाळवून मगच दुसऱ्यांना दिले पाहिजेत.
ऋतूनुसार कपडे द्या : उन्हाळ्यात सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, रेनकोट किंवा उबदार चादरी, हिवाळ्यात स्वेटर, शाली, गोधड्या, सोलापुरी चादरी यांचे दान केले पाहिजे. अन्यथा ऋतुमानानुसार कपडे नसतील तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही.
सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी : अनेकदा आपल्याला दान करण्याची इच्छा असते. परंतु दान नेमके कोणाला करावे, हे उमगत नाही. किंवा आपल्या संपर्कात तसे लोक नसतात. अशा वेळी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी आणि ज्या संस्था मनापासून काम करत आहेत, त्यांना मदत करून खारीचा वाटा उचलावा.