Solar Eclipse 2022: २७ वर्षांनी सूर्यग्रहणाला अद्भूत संयोग! तूळ राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग; कसा असेल ग्रहण प्रभाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 05:09 PM2022-10-24T17:09:23+5:302022-10-24T17:11:12+5:30
Solar Eclipse 2022: २७ वर्षांपूर्वीही दिवाळीत सूर्यग्रहण लागले होते. ग्रहांची स्थितीही अगदी यंदासारखीच होती, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...
Solar Eclipse 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहण लागणार आहे. सन २०२२ मधील दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे. भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण असणार असून, ऐन दिवाळीत हे खंडग्रास पद्धतीने सूर्यग्रहण दिसेल. २५ ऑक्टोबर रोजी हे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार असून, ग्रहणाचा कालावधी ४ तास ३ मिनिटे असणार आहे. या सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात आहे. तूळ राशीतील ग्रहांचा अद्भूत संयोग आणि ग्रहणाचा देश-दुनियेवरील प्रभाव याबाबत जाणून घेऊया... (Solar Eclipse 2022)
दिवाळीत सूर्यग्रहण लागण्याचा योग २७ वर्षांपूर्वी जुळून आला होता. सन १९९५ मध्ये २३ ऑक्टोबरला दिवाळीचा सण होता आणि २४ ऑक्टोबरला सूर्यग्रहण होते. यंदा दिवाळी २४ ऑक्टोबरला आणि ग्रहण २५ ऑक्टोबरला आहे. सन १९९५ मध्येही तूळ राशीत सूर्यग्रहण झाले होते आणि या वर्षीही तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. (surya grahan in diwali 2022)
तूळ राशीत ४ ग्रहांचा दुर्मिळ योगायोग
सन १९९५ मध्ये जेव्हा सूर्यग्रहण झाले होते. तेव्हा तूळ राशीत चार ग्रह एकत्र होते. यावेळी राहू, सूर्य, शुक्र आणि चंद्र तूळ राशीत होते. यंदाच्या २५ ऑक्टोबरला होणाऱ्या सूर्यग्रहणात राहू, सूर्य, शुक्र आणि चंद्र तूळ राशीत विराजमान असतील. याशिवाय २७ वर्षांपूर्वी शनी स्वराशीत होता. यंदाही शनी आपले स्वामित्व असलेल्या मकर राशीत आहे. याशिवाय १९९५ मध्ये बुध कन्या राशीत होता आणि यावेळीही बुध कन्या राशीत विराजमान आहे. यंदाचे सूर्यग्रहण कर्क, सिंह आणि धनु राशींना अतिशय शुभ ठरणार आहे. तर वृषभ, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर राशीच्या व्यक्तींना काहीसे समस्याकारक ठरू शकेल. याशिवाय कुंभ आणि मीन राशींना हे ग्रहण संमिश्र ठरू शकेल.
सूर्यग्रहणाचा देश-दुनियेवर प्रभाव कसा असेल?
सूर्यग्रहणाचा उज्जैन आणि आजूबाजूच्या परिसरात अधिक प्रभाव दिसू शकेल. राजस्थान, कच्छ आणि गुजरातमधील व्यापारी वर्गातील लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सूर्यग्रहणानंतर सरकारी यंत्रणांची कारवाई व्यापारी वर्गातील लोकांना त्रस्त करू शकते. गहू, मोहरी आदी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येऊ शकते. याशिवाय सूर्यग्रहणाचा प्रभाव युरोप, मध्य पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उत्तर महासागरात सर्वाधिक दिसून येईल. हे सूर्यग्रहण युरोपियन देशांसाठी चांगले होणार नाही, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"