देवघराची दिशा कोणती असावी आणि कोणते नियम पाळावेत, यासंबंधी वास्तू शास्त्राच्या काही सूचना!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:00 AM2021-06-04T08:00:00+5:302021-06-04T08:00:03+5:30
देवघराची दिशा योग्य असणे फार महत्वाचे आहे, अन्यथा अनेक समस्यांना अकारण सामोरे जावे लागू शकते.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, अशी जरी आपली स्थिती असली, तरीदेखील देवाच्या सान्निध्यात ते दोन क्षण पुरेसे असतात. हा नित्य सहवास मिळावा, म्हणून घरोघरी देवघर असते आणि रोज यथाशक्ती देवपूजा केली जाते. वास्तू शास्त्रानुसार देवघराची दिशा योग्य असेल आणि पूजा करताना तुमची बैठक योग्य दिशेने असेल, तर दिशेचा प्रभाव तुमच्या प्रार्थनेवर पडू शकतो. यासाठी काही वास्तू टिप्स-
जर प्रत्येक खोली आणि वस्तू घरात योग्य ठिकाणी असतील तर ते सुख, संपत्ती, चांगले संबंध प्रस्थापित होतात. परंतु वस्तूंचे ठिकाण अयोग्य असेल, तर वास्तुदोष निर्माण होतात आणि अनेक छोट्या मोठ्या कार्यात त्रुटी, अडचणी आणतात. देवघर हे देखील अत्यावश्यक गोष्टींपैकी एक आहे. देवघराची दिशा योग्य असणे फार महत्वाचे आहे, अन्यथा अनेक समस्यांना अकारण सामोरे जावे लागू शकते. यासाठी जाणून घ्या की देवघर बांधताना वास्तुशास्त्राचे कोणते नियम पाळले पाहिजेत.
मंदिर नेहमीच अशा प्रकारे बांधले पाहिजे की पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे असेल. घराचा ईशान्य कोपरा उपासना करण्यासाठी योग्य ठरतो.
वास्तुनुसार घर मोठे असल्यास देवघरासाठी स्वतंत्र खोली असावी. जागा कमी असल्यास, दिशा ठरवून घरात योग्य ठिकाणी देवघराची रचना करावी.
स्वतंत्र देवघर बांधले असेल, तर त्या खोलीत गडद रंगाचा वापर करू नये. तसेच वेगवेगळ्या रंगसंगती वापरू नयेत. एकच रंग वापरावा. तो रंगही आल्हाद दायक असावा. त्यात पिवळा, जांभळा, केशरी अशा रंगांची निवड करता येऊ शकेल.
देवघरापेक्षा आपल्या बैठकीचे स्थान उंच असू नये. मंदिराची उंची अशी असावी कीदेवघर भिंतीवर लावलेले असल्यास देवाच्या पायाचे आणि आपल्या हृदयाचे स्थान समान उंचीवर असावे.
काही लोक देवघरात पूर्वजांच्या तसबिरीदेखील ठेवतात. असे करणे अशुभ आहे. पूर्वजांचे स्मरण म्हणून ठेवलेल्या तसबिरी भिंतीवर लावाव्यात परंतु देवघरात ठेवू नये.
संगमरवरी किंवा लाकडी देव्हारा अतिशय शुभ मानला जातो. त्यात देवतांना स्थान देऊन धूप, दीप, गंध, फुलांनी पूजा करणे आणि देव्हारा सजवणे चैतन्यमयी ठरते.