काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, पण नंतर उमगते, 'जे होते ते चांगल्यासाठी!'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:00 AM2022-02-22T08:00:00+5:302022-02-22T08:00:02+5:30
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याचा फार विचार करू नका. कदाचित भविष्यात तुम्हीच म्हणाल, जे होतं ते चांगल्याचसाठी!
गीतेचे सार तुम्ही वाचले आहे का? त्यात म्हटले आहे, 'जे झालं ते चांगल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी, जे होणार आहे तेही चांगल्यासाठी.' एका मर्यादेनंतर परिस्थिती जेव्हा आपल्या हातात उरत नाही, तेव्हा गीतेचे सार लक्षात आपण लक्षात घेतले, तर अकारण त्रागा होणार नाही आणि आपणच मान्य करू, जे होते, ते चांगल्यासाठी!
एकदा दिल्लीतले एक डॉक्टर व्याख्यानासाठी दुसऱ्या शहरात जात होते. विमानप्रवासाने त्यांना जायचे होते. ते प्रवासासाठी वेळेत पोहोचले आणि विमानही वेळेत निघाले. इथवर सगळे व्यवस्थित झाले आता व्याख्यानाचा नियोजित कार्यक्रमही वेळेत पार पडावा, या विचाराने त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि आपला लॅपटॉप काढून व्याख्यानातील मुद्द्यांचा विचार करू लागले.
प्रवास छान सुरू होता. परंतु, काही काळातच हवामान बिघडले. आणि विमानचालकाला दुसऱ्या विमानतळावर नाईलाजाने विमान उतरवावे लागले. अवघ्या काही तासांचा प्रवास उरलेला असताना अशी गडबड झालेली पाहून डॉक्टर गोंधळले. वेळेत पोहोचलो नाही, तर लोक ताटकळत राहतील. त्यांनी आयोजकांना फोन केला आणि आपण उतरलेल्या ठिकाणाची माहिती दिली. आयोजक म्हणाले, 'डॉक्टरसाहेब, तुम्ही तिथून टॅक्सीने आलात तरी तीन तासात इथे पोहोचाल आणि कार्यक्रम वेळेत सुरू होईल.'
डॉक्टरांना मोठ्या मुश्किलीने तिथे जायला एक टॅक्सी मिळाली. डॉक्टरांनी टॅक्सीचालकाला पत्ता सांगून वेळेत पोहोचवण्याची विनंती केली. टॅक्सीचालकाने प्रवास सुरू केला, पण त्यालाही वादळाचा सामना करावा लागला. त्या वादळात आणि पाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसात टॅक्सीचालक मार्ग भरकटला. त्याच्या लक्षात येताच त्याने माफी मागितली आणि आता काही वेळ एका ठिकाणी थांबून मग पुढचा प्रवास करावा अशी विनंती केली.
डॉक्टरांचा नाईलाज झाला. टॅक्सीचालकाने टॅक्सी थांबवली, तिथे एक झोपडीवजा घर होते. त्या दोघांनी घराचे दार ठोठवले आणि तिथल्या आजींना घरात घेण्याची विनंती केली. आजींनी त्यांना आत घेऊन चहा पाणी दिले. डॉक्टरांनी आजींचे आभार मानले. आजी आपल्या झोपलेल्या नातवाकडे बोट दाखवत म्हणाल्या, `माझे आभार मानू नका. सदिच्छा द्यायच्याच असतील, तर माझ्या नातवाला द्या. त्याला आशीर्वादाची गरज आहे. तो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. दिल्लीतले एक ख्यातनाम डॉक्टर आहेत, तेच एकमेव याचा इलाज करू शकतील. पण त्याचे आई वडील वारले. मी म्हातारी त्याला कसे काय नेणार? तुमच्या सदिच्छा त्याला मिळाल्या तर काही चमत्कार घडेल.'
डॉक्टर म्हणाले, `आजी चमत्कार घडला आहे. तुम्ही ज्या डॉक्टरांबद्दल बोलताय, तो मीच आहे. आज मला व्याख्यानाऐवजी देवाने इथे तुमच्या नातवाच्या मदतीसाठीच पाठवले आहे. मी त्याचे उपचार अवश्य करीन. उगीच मी मगापासून राग राग करत होतो. परंतु म्हणतात ना, जे होते ते....चांगल्याचसाठी!'