Somvati Amavasya 2022: नववर्षातील पहिली सोमवती अमावास्या; ३० वर्षांनी जुळून येतायत अद्भूत योग; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:41 AM2022-05-25T07:41:15+5:302022-05-25T07:42:19+5:30
Somvati Amavasya 2022: वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंतीही साजरी केली जात असून, या अमावास्येच्या व्रताचरणाचा शुभ मुहूर्त, मान्यता आणि महत्त्व जाणून घ्या...
नवीन वर्ष सुरू होऊन आता दोन महिनेही सरले. काळ इतका पटापट केला की, वैशाख अमावास्या कधी येऊन ठेपली हे समजले सुद्धा नाही. यंदाची वैशाख अमावास्य विशेष मानली जात आहे. कारण ही अमावास्या सोमवती अमावास्या आहे. सोमवारी अमावास्या आली की, तिला सोमवती अमावास्या म्हटले जाते. यंदाच्या वर्षी सोमवार, ३० मे २०२२ रोजी वैशाख सोमवती अमावास्या आहे. या दिवशी सुवासिनी विशेष व्रताचे आचरण करतात. तसेच या दिवशी विशेष महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीची पूजा केली जाते. (somvati amavasya may 2022)
वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती साजरी केली जाते. सन २०२२ मध्ये केवळ दोन वेळा सोमवती अमावस्याचा योग जुळून येणार आहे. त्यातील पहिली सोमवती अमावास्या वैशाख महिन्यातील असणार आहे. ३० वर्षांनी या अमावास्येला शुभ योग जुळून येत आहे. तो म्हणजे शनैश्चर जयंतीला शनी आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान असेल. सोमवती अमावास्या आणि शनैश्चर जयंती हा योग शुभ मानला जात आहे. याचे कारण शनी देव महादेवांना आपले गुरू मानतात. त्यामुळे या दिवशी गुरु-शिष्याचे एकाच दिवशी पूजन करण्याचे भाग्य भाविकांना लाभणार आहे. याशिवाय, वृषभ राशीत बुधचा उदय या दिवशी होणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग जुळून येणार आहे. (somvati amavasya may 2022 date and time)
वैशाख सोमवती दर्श अमावास्या: ३० मे २०२२
सोमवती दर्श अमावास्या प्रारंभ: रविवार, २९ मे २०२२ रोजी दुपारी ०२ वाजून ५४ मिनिटे.
सोमवती दर्श अमावास्या समाप्ती: सोमवार, ३० मे २०२२ रोजी सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे वैशाख महिन्यातील सोमवती दर्श अमावास्या ३० मे २०२२ रोजी साजरी करावी, असे सांगितले जात आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावास्या भाग्याची असल्याचे सांगितले आहे. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना, नामस्मरण, आराधना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. अनेक ठिकाणी या दिवशी शिवमंदिरांमध्ये विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (somvati amavasya may 2022 significance)
सोमवती अमावास्येचे महत्त्व
वर्षभरात सुमारे दोन ते तीन वेळा सोमवती अमावास्या येते, असे म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे सोमवती अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त होते. सोमवती अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. ज्या व्यक्तींच्या राशीत चंद्र ग्रह कमकुवत असतो. त्या व्यक्तींनी सोमवती अमावास्येला गोमातेला अन्नदान करावे, असा सल्ला दिला जातो. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. गंगास्नान शक्य नसलेल्या व्यक्तींनी नदी किंवा तलावात स्नान करावे, असे सांगितले जाते.