Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला पितरांची आणि तुळशीची पूजा केल्याने होणारे लाभ जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:00 AM2024-04-08T07:00:00+5:302024-04-08T07:00:02+5:30
Somvati Amavasya 2024: ८ एप्रिल रोजी फाल्गुन तथा सोमवती अमावस्या आहे, या दिवशी केलेले उपचार आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात, कसे ते पहा!
हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते. तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी असे शास्त्र सांगते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :
सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते. तुळशीला हरिप्रिया असेदेखील संबोधले जाते. म्हणजेच हरी आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा करा असे सांगितले जाते.
सोमवती अमावस्येचे महत्त्व :
सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
पूजेचा विधी:
सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे. नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगांचे स्मरण करावे. शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे.
पूजेचा शुभ मुहूर्त :
अमावस्या तिथि: ८ एप्रिल, सोमवार
सोमवती अमावस्येचा प्रारंभ: ७ एप्रिल मध्य रात्री ३. २१ मिनिटांनी
सोमवती अमावस्येचे चे समापन: ८ एप्रिल रात्री ११. ५१ पर्यंत