कर्माची गती कोणालाही चुकविता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 12:48 PM2021-04-28T12:48:24+5:302021-04-28T12:48:49+5:30

प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे...!

The speed of karma cannot be missed by anyone | कर्माची गती कोणालाही चुकविता येत नाही

कर्माची गती कोणालाही चुकविता येत नाही

googlenewsNext

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

या जगांत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात, असा शास्त्र सिद्धांत आहे. प्रारब्ध जर अमान्य केले तर काही प्रश्नांची उत्तरे मिळतंच नाहीत.

कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही ईप्सित साध्य होत नाही. कधी कधी प्रयत्न न करताही एखादी गोष्ट विनासायास मिळते. मला एका लोककवीची एक सुंदर कविता आठवते, कवी म्हणतो - कर्माची गती कोणालाही चुकविता आली नाही.

जीवनी एक तत्व जाणा । चुकेना कर्मगती कोणा ॥
म्हणती ज्या पुण्यश्लोक पहिला । नृपवर नल राजा झाला ।
तयाची काय झाली दैना । चुकेना कर्मगती कोणा ॥

एवढा पुण्यश्लोक नल राजा पण दैवाचा कोप झाल्यावर ऋतुपर्ण राजाच्या घोड्याचे सारथ्य व खरारा त्याला करावा लागावा काय..?

रघुवीर राम एकवचनी । जानकीसह तो जाई वनी ।
घेवोनि संगे लक्ष्मणा । चुकेना कर्मगती कोणा ॥

पित्याच्या वचनपूर्तीसाठी रामाला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. त्यांची कसलीही चूक नसतांना प्राक्तनाचा हा घाला कशामुळे..? याचे उत्तर काय..? तर फक्त प्रारब्ध असेच द्यावे लागेल दुसरे काय..?

अहो..! पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे एवढे एकनिष्ठ भक्त होते पण कर्मगतीचा फेरा तर त्यांनाही चुकविता आला नाही. बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास तर पांडवांच्याही नशिबाला आलाच ना..?

पांडव धर्मनिष्ठ असुनि । द्रौपदी कृष्णाची भगिनी ।
कौरवे किती केली छळना । चुकेना कर्मगती कोणा ॥
ऋषीमुनी मोक्ष अधिकारी । तसे ते नृपती चक्रधारी ।
करावी कित्येकांची गणना । चुकेना कर्मगती कोणा ॥

तात्पर्य काय..? तर प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे. अथक प्रयत्न करुनही ईप्सित साध्य होत नसेल तर खचून न जाता 'प्रारब्धाचा' भाग समजून गप्प रहावे. कांही गोष्टी जगांत अशा आहेत की, त्या संचितानेच प्राप्त होतात. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हा ईश्वरी व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही व्यवस्था अमान्य करुन खरं तर माणसाला जगताच येत नाही..!

Web Title: The speed of karma cannot be missed by anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.