भक्तीमुळेच आध्यात्मिक उन्नती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:55 PM2020-08-19T16:55:39+5:302020-08-19T16:55:45+5:30
देव मानले तर महान पण अदृश्य शक्ती आहे, त्याचे तरंग आपल्या कमार्नुसार चांगले- वाईट परिणाम देत असतात.
मन:शांती बरोबरच मन:शक्ती वाढविण्यासाठी आध्यात्माचा मार्ग उपयोगी पडू शकतो. सुखात असो वा दु:खात आपण आपल्या श्रद्धा असलेल्या देवी- देवतांच्या अधीन होतो, आणि सर्वकाही त्याला अर्पण करतो. ही श्रद्धा, ही भक्ती व्यक्तीला अधिक उन्नत होण्यास नक्कीच मदत करत असते. तसेच निस्वार्थपणे आणि श्रद्धेने केलेले नामस्मरण आपल्या आयुष्याचा हा भवसागर तरून जाण्यास साह्य करते. आयुष्य म्हटले की चढउतार हे आलेच. कधी हा चढउताराचा झोका आकाशाच्या उंचीवर घेऊन जातो, तर कधी अगदी स्वत:ला स्वत:च्याही नजरेतून उतरवतो. या यशापयशाला, मानापमानांना समोर जाण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कुणी जीवनातील बदलांना धीराने समोर जातात, तर कोणी एखाद्या छोट्याशा धक्क्यानेदेखील कोसळतात. म्हणून मनुष्यजन्म पार करण्यासाठी शरीराच्या सोबत मनाचे सशक्तीकरण आवश्यक आहे. ते साधण्यासाठी आपल्याकडे प्रार्थना, पूजापाठ, स्तोत्र पठण इत्यादी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. नियोजित काम उत्तम पद्धतीने पार पाडणे ही एक प्रकारची देवपूजा आहे. देव मानले तर महान पण अदृश्य शक्ती आहे, त्याचे तरंग आपल्या कमार्नुसार चांगले- वाईट परिणाम देत असतात. म्हणून चुकीच्या अथवा स्वार्थी श्रद्धेने केलेली भक्ती आपल्याला जन्माची अद्दल घडवू शकते. म्हणून भक्ती, श्रद्धा शुद्ध आणि प्रामाणिक असायला हवी.
आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं झ्र जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. मन:शांतीचा मार्ग मनाकडून मनातून शांतीकडे जातो. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आनंद हा कशावरही अवलंबून नसतो. म्हणजेच तो निरालंब असतो. स्वयंभू असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो.
- वेदांताचार्य राधेराधे महाराज
बर्डेश्वर संस्थान, तरवाडी.