मन:शांतीसाठी आध्यात्मिक दृष्टीकोन महत्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 06:47 PM2020-10-29T18:47:10+5:302020-10-29T18:49:24+5:30
Spirituality मनाच्या शांतीसाठी आध्यात्मिक दृष्टीकोन महत्वाचा
भोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाºया चिंता, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सवार्चा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे. संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे.आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. थोडक्यात भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरते. अध्यात्म आणि धर्म या दोन्ही बाबी संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे ‘कोणीतरी’, असते हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. त्यामुळे अध्यात्म आणि धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी समान नाहीत.धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. अनेकदा धार्मिकता ही रूढी-परंपरा, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात. अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’चा शोध घेतला जातो. ‘स्व’चा शोध घेण्याच्या पध्दती वेगवेगळ्या असल्या तरी आत्मिक सुखासाठी प्रत्येक जीवाची धडपड सुरू आहे.पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी धडपडते, अक्षरश: जीवाचे रान करते; प्रत्यक्षात ते मिळते का? आणि मिळाल्यास ते किती काळ टिकते? हा भाग निराळा मानला. तरी समाजातील प्रत्येक जीवाची सुखासाठीच धडपड आहे. - अनिल तुळशीराम गवईखामगाव.