खेळ मांडला...बावन्न पत्त्यांमधून उलगडले अध्यात्म!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 04:36 PM2020-12-21T16:36:24+5:302020-12-21T16:36:59+5:30

आयुष्य हा एक पत्त्याचा खेळ आहे. दर वेळी हुकुमी पत्ते आपल्या हातात येतीलच असे नाही. परंतु मिळालेल्या पत्त्यांवर डाव कसा जिंकायचा यात प्रत्येकाचे कसब पणाला लागते. एकदा का या पत्त्यांचा उलगडा झाला, की हा खेळ अधिक सोपा होत जातो. कसा ते पहा.

Spirituality unfolded from 52 leaves! | खेळ मांडला...बावन्न पत्त्यांमधून उलगडले अध्यात्म!

खेळ मांडला...बावन्न पत्त्यांमधून उलगडले अध्यात्म!

googlenewsNext

बालपणापासून आपण विरंगुळा म्हणून पत्त्यांचे विविध खेळ खेळलो असू. कोणाची झेप रमी पर्यंत, तर कोणाची राजा-भिकारीपर्यंत. कोऱ्या पत्त्यांची मोहिनी सर्वांवरच असते. परंतु, पत्त्यांचा डाव मांडणे, नाहीतर घर बांधणे यापलीकडे ५२ पत्त्यांमध्ये दडलेले अध्यात्म किंवा खेळ समजून घेण्याइतकी आपली वैचारिक बैठक नसते. मात्र, अलीकडेच समाजमाध्यमावर श्री शंकर महाराजांना यांच्या नावे एक संदेश वाचला. तो त्यांचा आहे, की अन्य कोणाचा, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. परंतु, त्या संदेशात दडलेला संदेश वाचला आणि पत्त्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. तो संदेश पुढीलप्रमाणे!

शंकर महाराजांना पत्त्यांचा छंद होता. त्यांना खेळायची लहर आली की ते भेटायला आलेल्या माणसाला पत्ते खेळायला बसवीत. असेच एकदा कोराड मास्तर, श्री. भस्मेकाका आणि रघू यांच्याबरोबर महाराजांनी पत्त्यांचा डाव मांडला होता.

खेळता खेळताच रघूच्या मनात आलं, 'पत्ते खेळणं काही फारसं चांगलं नाही. पण महाराज का खेळतात ?'

महाराज रागावतील म्हणून त्याने हा  प्रश्न मनातच ठेवला. परंतु त्याच वेळी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. ते किंचित हसले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, "हा पत्त्यांचा डाव वाईटच. होय ना रे ? पण तो त्याचा अर्थ न कळणाऱ्यांना."

हेही वाचा : ध्येयविरहित जीवन म्हणजे पत्त्याशिवाय पाठवलेले पत्र- व.पु.काळे

अर्थ ? पत्त्यांना कसला अर्थ असणार ? असा विचार रघू करतो आहे तोच महाराज पुढे म्हणाले, "अरे बाबा, याचा अर्थ गूढ आहे."

महाराजांनी एकेक पान समोर ठेवीत म्हटलं -

दुर्री = म्हणजे पृथ्वी आणि आकाश.
तिर्री = ब्रह्मा, विष्णू, महेश.
चौकी = चार वेद.
पंजी = पंचप्राण. 
छक्की = काम, क्रोध हे सहा विकार.
सत्ती  = सात सागर.
अठ्ठी = आठ सिद्धी.
नव्वी = नऊ ग्रह.
दश्शी = दहा इंद्रिये, पाच कर्मेंद्रिये + पाच ज्ञानेंद्रिये.
गुलाम = आपल्या मनात येणाऱ्या वासना, इच्छा. माणूस त्यांचाच गुलाम होऊन राहतो.
राणी = माया.
राजा = या सर्वांवर स्वार होऊन त्यांना चालवणारा.
आणि एक्का = विवेक. माणसाची सारासार बुद्धी. या सर्व खेळ खेळाला स्वाधीन ठेवणारा.

काय रे ? डोक्यात शिरलं का काही ? आता या लहानग्याला काय कळणार ? त्यानं गोंधळून एकदा होकारार्थी मान हलवली. एकदा नकारार्थी मान हलवली.

महाराज हसले. मास्तरांना म्हणाले, "तुम्ही सांगा याची फोड करून!"
"मला सुद्धा नीटसं नाही सांगता यायचं. पण प्रयत्न करतो. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे, तिच्या नादानं वाहावत जातं ते माणसाचं मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेवू शकतो, त्याला अंकुश लावू शकतो तो विवेक- हुकुमाचा एक्का म्हणजेच सदगुरू!"

"बरोबर." महाराज म्हणाले, "समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध ! त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहित नसतात. पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगतो."

हेही वाचा : "नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Web Title: Spirituality unfolded from 52 leaves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.