पहाटेच्या पारी घ्यावे हनुमंताचे नाम, पूर्ण होईल अधुरे काम; दिवसाची सुरुवात करा या १२ नावांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:42 AM2021-03-20T07:42:43+5:302021-03-20T07:43:04+5:30
भक्ती, युक्ती आणि शक्तीने श्रेष्ठ असलेल्या श्रीराम भक्त हनुमानाची बारा नावे घेऊन आजच्या दिवसाची मंगलमयी सुरुवात करूया आणि खोळंबलेल्या कामांना हनुमान गतीने मार्गी लावूया.
कलियुगात मनुष्याला या भवसागरातून तारणारे काही असेल, तर ते म्हणजे भगवंताचे नाम! ते नाम कोणत्याही देवाचे असो, यावर निर्बंध नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात, 'ठायीच बैसोनि करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा' म्हणजेच, तुम्ही जिथे असाल तिथे शांत चित्ताने तुमच्या उपास्य दैवताचे नाम घेतलेत तरी ते परमात्म्याला जाऊन मिळते. त्याची रूपे विविध आहेत, परंतु शक्ती एकच आहे.
यानुसार भगवंताच्या कोटी कोटी रूपांपैकी शनिवारी आठवण होते, ती म्हणजे हनुमंताची. भगवंताच्या प्रत्येक रूपातून, अवतारातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. त्या रूपांचा आठव व्हावा, म्हणून सण, उत्सव यांचे पूर्वजांनी आयोजन केले आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक वार देवाला अर्पण केला आहे.
शनिवार हनुमंताचा आणि शनिदेवाचा! हनुमंताची भक्ती एवढी श्रेष्ठ, की त्याची उपासना केली, तरी शनी महाराज संतुष्ट होतात. तर अशा भक्ती, युक्ती आणि शक्तीने श्रेष्ठ असलेल्या श्रीराम भक्त हनुमानाची बारा नावे घेऊन आजच्या दिवसाची मंगलमयी सुरुवात करूया आणि खोळंबलेल्या कामांना हनुमान गतीने मार्गी लावूया.
१. हनुमान
२. अंजनी सुत
३. वायु पुत्र
४. महाबल
५. रामेष्ठ
६. फाल्गुण सखा
७. पिंगाक्ष
८. अमित विक्रम
९. उदधि क्रमण
१०. सीता शोक विनाशन
११. लक्ष्मण प्राण दाता
१२. दशग्रीव दर्पहा
सियावर रामचंद्र कि जय! पवनसुत हनुमान कि जय! बोलो रे भाई सब संतन कि जय!