यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी दिवसाची सुरुवात 'या' पाच गोष्टींनी करा! - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 08:00 AM2022-05-09T08:00:00+5:302022-05-09T08:00:01+5:30

गॅझेट चार्जिंगला लावण्याआधी स्वत:ला सकारात्मक ऊर्जा देऊन दिवसभरासाठी चार्ज करा. ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर सकारात्मकतेचे बळ देणार आहे.

Start the day with these five things for a successful life! - Gaur Gopal Das | यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी दिवसाची सुरुवात 'या' पाच गोष्टींनी करा! - गौर गोपाल दास

यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी दिवसाची सुरुवात 'या' पाच गोष्टींनी करा! - गौर गोपाल दास

googlenewsNext

आज सकाळी उठल्यावर, जर हा लेख तुमच्या नजरेस पडला असेल आणि तो उघडून तुम्ही वाचला असेल, तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, तुम्ही काल रात्री डोळे बंद केलेत, ते आज सकाळी पुन्हा उघडण्याची तुम्हाला संधी मिळाली. अनेकांनी काल रात्रीच ती संधी गमावली आहे, हे लक्षात घ्या. मात्र, तुम्हाला ती संधी मिळाली आहे. संधी कोणती? तर दिवसाची, आयुष्याची नवी सुरुवात करण्याची, नवीन दिशा निवडण्याची. यासाठी रोज सकाळी पाच गोष्टी नक्की करा.

सकाळी उठल्यावर चुकूनही मोबाईल, लॅपटॉप, नोटबुक अशा गॅझेटना हात लावू नका. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेने करा. गॅझेट चार्जिंगला लावण्याआधी स्वत:ला सकारात्मक ऊर्जा देऊन दिवसभरासाठी चार्ज करा. ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर सकारात्मकतेचे बळ देणार आहे. तुमच्याकडे काय नाही, ते आठवण्याऐवजी काय आहे, ते आठवून पहा. आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची श्रीमंती नसलेल्या गोष्टींची उणीव भरून काढण्यास मदत करेल. 

दिवसभरात काय करायचे आहे, हे ठरवण्याआधी स्वत: दिवसभरातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केल्याने मलाही सर्व काही जमू शकते, हा आत्मविश्वास स्वत:ला द्या. जेणेकरून जगाने तुम्हाला कमी लेखले, तरी तुम्ही स्वत:ची साथ कधीच सोडणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खचू देणार नाही. 

कोणत्याही कामात आपल्या वतीने १०० टक्के प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. याउपर ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा विचार सोडून द्या. मात्र, प्रयत्न न करता अपयश स्वीकारू नका. प्रयत्नांती अपयश आले, तरी ते आपल्या भल्या मोठ्या आयुष्याचा छोटासा भाग आहे, असे म्हणून ते अपयश पचवण्याची तयारी ठेवा. 

एकाच वेळी चार गोष्टी करण्यापेक्षा एकावेळी एकच गोष्ट करा. जर छोट्या छोट्या गोष्टी नीट करू शकला नाहीत, तर मोठ्या गोष्टी नीट कधीच करू शकणार नाही. यासाठीच प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करा. त्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद आणि जगण्याचे बळ देतील. 

पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमच्या पडत्या काळात जशी कोणाची शाब्दिक, मानसिक, आर्थिक गरज असते, तशीच इतरांनाही असते. दुसऱ्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती मदत करा. मनात वैरभाव किंवा स्वार्थ न ठेवता केलेली मदत दुसऱ्यांपेक्षा तुम्हालाच अधिक आनंद देणारी ठरेल.

प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो,
प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते!

या दोन्ही गोष्टींचा आयुष्यात पुरेपूर उपयोग करून घ्या आणि रोज नवीन संधी दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार माना. 

Web Title: Start the day with these five things for a successful life! - Gaur Gopal Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.