आपल्या दिवसाची आणि नव वर्षाची प्रसन्न सुरुवात 'या' श्लोकांनी करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 08:00 AM2022-01-01T08:00:00+5:302022-01-01T08:00:07+5:30

अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे. 

Start your day and New Year with 'these' verses! | आपल्या दिवसाची आणि नव वर्षाची प्रसन्न सुरुवात 'या' श्लोकांनी करा!

आपल्या दिवसाची आणि नव वर्षाची प्रसन्न सुरुवात 'या' श्लोकांनी करा!

Next

आपली सकाळ कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळ प्रसन्न तर दिवसही मजेत जातो. म्हणून सद्विचारांचे बीज सुपीक डोक्यात पेरून दिवसभर मनाची उत्तररित्या मशागत करावी. अशात आज नवं वर्षाचा पहिला दिवस! यासाठी आपल्या संस्कृतीने उत्तम संस्कार घातला आहे. तो कोणता, हे सविस्तर जाणून घेऊया. 

प्रात:काली अंथरुणावरून उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे श्लोक व मंत्ररुपाने स्मरण करावे. या उपचाराला प्रात:स्मरण म्हणतात. याविषयी एका श्लोकात वर्णन केले आहे,

ब्राह्मे मुहुर्ते चोथात्म चिन्तयेदात्मनो हितम् 
स्मरणं वासुदेवस्य कुर्यात् कलिमलावहम्

ब्राह्म मुहूर्ती उठून आत्मकल्याणाचे चिंतन करावे. त्याचप्रमाणे कलीदोष दूर करणारे वासुदेवाचे स्मरण करावे. प्रात:स्मरण करण्याचे काही विधीसंकेत आहेत. आपण काही ब्राह्म मुहूर्तावर उठणाऱ्यातले नाही. निदान, जेव्हा उठू, तेव्हा ईश स्मरणाने सुरुवात नक्कीच करता येईल. 

आदित्य गणनाथं च देवी रूद्रं यथाक्रमम
नारायणं विशुद्धाख्यमनोच कुलदेवताम

सूर्य, गणपती, देवी व विशुद्ध कीर्तीचा नारायण यांचे यथाक्रम स्मरण करून शेवटी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात सूर्यस्मरणाचे, गणपतीस्मरणाचे, देवी स्मरणाचे, शिवाच्या स्मरणाचे व भगवान विष्णूच्या स्मरणाचे श्लोक दिले आहेत.

नवग्रह, भृग्वादी ऋषी, सनत्कुमारादी देवर्षी, सप्तलोक, सप्तसमुद्र, सप्तर्षी, सप्तकुलपर्वत, पृथू, अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृष्ण, परशुराम हे सप्तचिरंजीव, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पतिव्रता, पाच पांडव, नल, युधिष्ठिर इ. पुण्यश्लोक राजे, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती ही मोक्षदायी तीर्थक्षेत्रे यांचे पुण्यस्मरण करावे. चारित्र्य, कर्तृत्व, श्रेष्ठत्व असलेल्या पुण्यशील विभूतींचे, श्रद्धा स्थानांचे पुण्यस्मरण, नामसंकीर्तन करावे. ज्यांच्या स्मरणाने मन:शांती प्राप्त होते. आपल्या जीवनातील अंध:कार जाऊन जीवन प्रकाशमय होईल अशा चैतन्यशील प्रेरणादायी श्रेष्ठतम गुणवर्धक रुपांचे चिंतन, स्मरण करावे. हा हिंदूंचा मूलाधार आहे. जीवन सुखसमृद्ध करणाऱ्या सृष्टीतल्या सर्व गोष्टी व भूतमात्रांबद्दलची कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

यथोचित प्रात:स्मरण झाल्यावर ज्या भूमीवर आपले सर्व जीवन व्यवहार चालतात, जिच्या आधअरावर आपले सर्वस्व उभारले, तारले जाते, अशा भूमीमातेला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून श्लोक म्हणावा. 

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले,
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।

समुद्राचे वस्त्र परिधान करणाऱ्या व पर्वतरूपी उरोजांनी शोभणाऱ्या हे विष्णूपत्नी भूमाते, तुला नमस्कार आहे. माझ्या पायाचा तुला स्पर्श होतो त्याबद्दल मला क्षमा कर. प्रात:स्मरण हे हिंदू जीवन संस्काराचा श्रीगणेशा आहे. अशा संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकली. वर्धिष्णु झाली. यातच आपल्या परंपरेची चिरंतन थोरवी आहे. अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे. 

Web Title: Start your day and New Year with 'these' verses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.