भगवान बुद्धांच्या सहवासाने लबाड सावकाराचे आयुष्य कसे बदलले, त्याची ही कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 01:24 PM2021-07-10T13:24:32+5:302021-07-10T13:25:01+5:30
संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात.
एका गावात कांचनशेट नावाचा एक लबाड सावकार होता. अनेक भले बुरे मार्ग पत्करून, सामान्य लोकांची लुबाडणूक करून त्याने पुष्कळ माया जमवली होती. परंतु पूर्वजन्मातील संस्काराचा परिणाम म्हणून त्याला आपण मिळवलेल्या पापाच्या धनाचा पश्चात्ताप वाटू लागला. त्याची मन:शांती नष्ट झाली.
गावात त्याचवेळेस भगवान बुद्धांची प्रवचने चालू होती. आपण केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि मन:शांतीसाठी तो प्रवचनांना जाऊ लागला. परिणामत: त्याचे मन, आचरण हे बुद्धमय होऊन गेले. त्याला सद्धर्माची आस लागली.
एकदा तो गावात कामानिमित्त गेला असता त्याला खूप मोठी पडीक जमीन दिसली. तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे, असे त्याला प्रकर्षाने वाटले. तेथील राजाकडे त्याबद्दल चौकशी केली असता त्याने कांचनशेटची निकड ओळखून त्या जमिनीच्या बदल्यात तिच्याच किमती एवढे सोने मागितले.
मनाची आस पूर्ण करण्यासाठी कांचनशेठने आपला पापाचा पैसा न वापरता खूप कष्ट करून सोने जमवून जमीन खरेदी केली. तेव्हा राजाने चकित होऊन विचारले असता कांचनशेठ म्हणाला, `ही भूमी भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन होणार आहे, तेव्हा सद्धर्म वाढवण्यासाठी ही जमीन पुण्यमार्गाने मिळवणे हे माझे कर्तव्य होते.'
अशा प्रकारे लबाडीचा धंदा करून जो कांचनशेठ लोकनिंदेला कारणीभूत ठरला होता, तोच समाजहितासाठी सद्धर्माची कास धरू लागताच लोकप्रिय समाजसेवक झाला.
सत्संग का करावा, हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आले असेल. संगत जशी, तशी आपली घडण होत असते. संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात. म्हणून संतांनीदेखील सत्पुरुषाचा, सद्विचारी माणसाचा, ज्ञानी माणसाचा, नम्र माणसांचा आणि सत्कर्म करणाऱ्या संतवृत्तीच्या लोकांचा संग करा असे सांगितले आहे.