बोध देऊन गेलेल्या विंचवाची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 06:07 AM2020-10-08T06:07:07+5:302020-10-08T06:07:14+5:30
आनंदाने ध्यानाला बसलो आणि समोर नजर गेली. पाहतो तर काय - एक विंचू माझ्याकडे सरळ बघत होता. मनात भीतीचे वादळ उभे राहिले. आता काय करावे?
- धनंजय जोशी
झेन शिबिरासाठी कधी कधी शहरापासून जरा दूर जावे लागते. अशाच एका ठिकाणी जायचे ठरले. तिथे फक्त साध्या झोपडीसारखी सोय होती. दिवसातून दोनदा जेवणाची व्यवस्था व्हायची. बाकी सर्व वेळ साधना! संध्याकाळी सान सा निम भेटत, तुमची प्रगती कशी चालली आहे ते बघण्यासाठी.
मी माझ्या झोपडीपाशी पोहोचलो. माझे बसण्याचे आसन ठेवले. समोर एक छोटासा बुद्धाचा पुतळा ठेवला. उदबत्ती लावली... आनंदाने ध्यानाला बसलो आणि समोर नजर गेली. पाहतो तर काय - एक विंचू माझ्याकडे सरळ बघत होता. मनात भीतीचे वादळ उभे राहिले. आता काय करावे? पहिला विचार मनात आला, चप्पल कुठे आहे? ह्या विंचवाला मारल्याशिवाय हे एकांत शिबिर शक्यच नाही. चप्पल शोधायला लागलो; पण मी आणलेली चप्पल अगदी तकलादू ! मग एखादी काठी शोधायला लागलो. ती कुठे मिळेना. परत झोपडीमध्ये आलो, तर ते महाराज दिसेनात! जिथे पूर्वी होते तिथे ते नव्हतेच ! परत चिंतेचे वादळ ! इकडे तिकडे त्याला शोधू लागलो आणि दिसला तोपण आता माझ्यापुढे असण्याऐवजी तो माझ्या मागच्या बाजूला बसला होता. मी डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. मनामध्ये विचार आला, ‘अरे, तू ह्या झोपडीमध्ये सात दिवसासाठी आला आहेस, म्हणजे तात्पुरताच! तो विंचू कदाचित इथेच राहणारा असावा. मग ही झोपडी त्याची का तुझी? आणि तुला कोणी हक्क दिला त्या विंचवाला तिथून घालवून देण्याचा? तुला जेवढा इथे राहण्याचा अधिकार, तेवढाच त्याला नाही का?’
- शांतपणे डोळे उघडले. तो विंचू जिथे होता तिथेच होता. त्याला मनातल्या मनात म्हटले, ‘बाबा रे, मी इथे सातच दिवस राहणार. आपण दोघे शांतपणे बरोबर राहू. मी तुला मारत नाही आणि तुही मला माझी साधना करू दे!’ - साधना सुरू झाली. संध्याकाळी बघितले तर तो दिसेनासा झाला होता. सान सा निम मुलाखत घेण्यासाठी भेटले. म्हणाले, ‘हाउ आर यू? - मी नमस्कार घालून म्हणालो, ‘थँक यू फॉर युअर टीचिंग!’