जीवनात संघर्षाशिवाय गत्यंतर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:45 AM2020-06-29T10:45:27+5:302020-06-29T10:45:35+5:30
संघर्षातून मिळविलेला विजय आत्मिक आनंद प्राप्त करून देतो. आध्यात्मिक व भौतिक जीवनात संघर्ष आपला पिच्छा सोडत नाही. संघर्ष जर योग्य पद्धतीने झाला तर धैर्य प्राप्त होते. त्यातून त्याला यश मिळते.
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष
आईच्या गर्भापासूनच मानवी जीवनात संघर्ष आहे. अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीमध्येही संघर्ष असतोच. समजा अनुकूल परिस्थिती असेल तर तो गर्भ पूर्णत्व प्राप्त करतो. प्रतिकूल अवस्थेमध्ये तो गर्भ नष्ट होतो म्हणजे जीवनात संघर्ष आहे. अभ्यास, परीक्षा यातही संघर्ष आहेच, जे अभ्यास करतात ते चांगले मार्क मिळवितात जे अभ्यास करीत नाही ते नापास होतात. पास झालेले मोठ्या नोकरीच्या शोधात असतात तर नापास झालेले छोटी-मोठी नोकरी शोधण्यात वेळ घालवितात. कृषी, व्यापार, व्यवसाय, कला, कौशल्य, विज्ञान या सर्वच क्षेत्रात संघर्ष करावाच लागतो. योग करणे यातही संघर्ष आहेच.
संयम आणि इंद्रिय निग्रह करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहेच. उत्कर्ष व उत्थान यासाठीही संघर्ष आहे. सूर्य, चंद्र, भूमी, नक्षत्र, जल, वनस्पती, अग्नी, आकाश, वायू या सर्वांनाही संघर्ष असतोच. संघर्षातून मिळविलेला विजय आत्मिक आनंद प्राप्त करून देतो. आध्यात्मिक व भौतिक जीवनात संघर्ष आपला पिच्छा सोडत नाही. संघर्ष जर योग्य पद्धतीने झाला तर धैर्य प्राप्त होते. त्यातून त्याला यश मिळते. संघर्षातून मिळविलेल्या वस्तूंची किंमत कळते त्या व्यक्तीसाठी वा वस्तूसाठी किती प्रयत्न करावे लागतात. यातून त्या व्यक्तीला संघर्षाची किंमत कळते. दृढ विश्वास हा संघर्षातून येतो. संघर्ष हा सुखाचा महासागर आहे.
सखोल प्रयत्नातून एखादी वस्तू मिळविली तर त्याचा आनंद गगनात मावत नाही. संघर्षाचे तरंग उमटत राहावेत. यामुळे यशस्वी जीवन जगायला चैतन्याची ऊर्जा प्राप्त होते. संघर्षामुळे मनुष्य अधिक चांगला वागतो. संघर्षाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. संत ज्ञानेश्वरांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्वांनाच संघर्ष करावाच लागतो. तो स्वकीयांबरोबर अथवा परक्या लोकांबरोबर असो, संघर्ष हा जीवनात अटळ आहे. संघर्षशाली जीवन जगण्याला बळ देते. संघर्षातून एखादी ऊर्जा मिळवून पुढील कार्याला गती मिळते. संघर्ष हा जीवनाचा एक अमूल्य घटक आहे. संघर्ष करा, संघटित व्हा व आपले कार्य साध्य करा.