मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यामागे महान भारतीय ऋषींची अशी होती दूरदृष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:39 PM2021-03-26T12:39:10+5:302021-03-26T12:42:00+5:30
ज्या ईश्वराने जीव निर्माण केला, तो ईश्वर कोणत्याही जीवाचा बळी मागणार नाही, हा साधा विचार मानव आपल्या सद्सदविवेकबुद्धीने करत नाही, हे दुर्दैव!
देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी कार्यसिद्धी झाल्यावर देवाप्रती ऋणनिर्देश म्हणून देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी दिला जात असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. त्यांनी विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ याचे बलिदान लोकांना सुचवले. कारण नाराळालाही डोके, शेंडी, नाक, डोळे आहेत.
परंतु बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकावा झाला पाहिजे. म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला कुंकू लावायला व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले. त्यामुळे रक्ताचा लाल रंग येईल. अशाप्रकारे ऋषींनी मानवाला नर आणि पशूहत्येपासून वाचवले. शिवाय नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीर्घकाळ टिकणारे फळ आहे.
तरीदेखील आजही अनेक ठिकाणी पशूबळी देऊन धार्मिकतेला हिंसक वळण दिले जाते. ज्या ईश्वराने जीव निर्माण केला, तो ईश्वर कोणत्याही जीवाचा बळी मागणार नाही, हा साधा विचार मानव आपल्या सद्सदविवेकबुद्धीने करत नाही, हे दुर्दैव!
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना `श्रीफळ' म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.