Surya Grahan in Diwali: दिवाळीतील राेषणाईला चार चाॅंद, यंदा खंडग्रास सूर्यग्रहण सगळीकडे दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:41 AM2022-10-12T07:41:01+5:302022-10-12T07:42:18+5:30
solar eclipse in Diwali: दा. कृ. सोमण यांची माहिती; २५ ऑक्टोबरला ग्रहण सर्वत्र दिसणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदा दिवाळीत मंगळवारी, २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे दिवाळीत दीपोत्सवाच्या रोषणाईदरम्यान आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पाहायला मिळणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणीच असून, भारतातून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
आश्विन अमावास्या मंगळवार, २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असून, ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र (सॅरोस) १२४ क्रमांकाचे आहे. मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४:४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५.४३ वाजता
होईल. ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी ६:०८ वाजता सूर्यास्त होईल. तसेच, ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागर किनाऱ्यावरून ते पाहिल्यास ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल.
ही घ्या काळजी
सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्यातूनच पाहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पाहावे. या सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवार, ८ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. दिवाळीमध्ये सूर्यग्रहण येत असले, तरी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण येत नाही. यंदा शुक्रवार, २१ ऑक्टोबरला गोवत्स द्वादशी-वसुबारस, शनिवार, २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आहे. सोमवारी २४ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मी-कुबेरपूजन आहे. बुधवारी, २६ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा, भाऊबीज एकाच दिवशी आहेत.
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
गावाचे नाव ग्रहण प्रारंभ सूर्यास्त
पुणे सायंकाळी ४:५१. सायंकाळी. ६:३१
नाशिक सायंकाळी ४:४७ सायंकाळी ६:३१
नागपूर सायंकाळी ४:४९ सायंकाळी ६:२९
कोल्हापूर सायंकाळी ४:५७ सायंकाळी ६:३०
संभाजीनगर सायंकाळी ४:४९ सायंकाळी ६:३०
सोलापूर सायंकाळी ४:५६ सायंकाळी ६:३०