तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:00 AM2024-05-28T07:00:00+5:302024-05-28T07:00:00+5:30
Lakshmi Devi Upay In Evening: सूर्यास्तावेळी दिवेलागणीला काही गोष्टी आवर्जून केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
Lakshmi Devi Upay In Evening: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये सूर्योदयाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडील पंचांग पद्धती सूर्योदयानुसार आचरली जाते. म्हणजेच सूर्योदयाला जी तिथी असते, ती त्या दिवसाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. सूर्योदयाला अनेकविध गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. अगदी आराध्य देवतेच्या पूजन, नामस्मरणापासून ते व्यायामापर्यंत विविध गोष्टी सूर्योदयाला करणे सर्वोत्तम मानले जाते. परंतु, सूर्यास्ताचा कालावधी अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, असे सांगितले जाते.
सूर्यास्तावेळी तिन्हीसांजेचा काळ दिवेलागणीचा मानला जातो. यावेळी लक्ष्मी घरात येते, अशी लोकमान्यता आहे. तसेच सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्तावेळीही आराध्य देवाचे नामस्मरण करावे, देवासमोर दिवा लावावा, असे म्हटले जाते. देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये तिन्हीसांजेला विविध विधी केले जातात. या विधींसह लक्ष्मी देवीची उपासना, नामस्मरण, पूजन विशेष लाभदायक तसेच पुण्यफलदायी मानले जाते.
काही ज्योतिषीय मान्यतांनुसार, सूर्यास्ताची वेळ किंवा तिन्हीसांजेची वेळ, दिवेलागणीचा कालावधी लक्ष्मी देवीशी संबंधित असतो. या कालावधीत जर लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण केले, तर लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी काही कामे करणे शुभ मानले गेले आहे. ही कामे केल्याने लक्ष्मी देवीचे घरात शुभागमन होऊ शकते. देवीची कृपा लाभू शकते, असे सांगितले जाते. नेमके काय करावे? जाणून घेऊया...
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा
- दीपप्रज्ज्वलन: सूर्यास्तावेळी तिन्हीसांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा. यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, तिचे शुभाशीर्वाद मिळू शकतात. तसेच घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ शकते, असे सांगितले जाते.
- मौन धारण करणे: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये मौनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ऋषी-मुनी अधिकाधिक मौन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सूर्यास्तावेळी दिवेलागणीला मौन धारण करावे, असे सांगितले जाते. या कालावधीत आपल्या आराध्याचे नामस्मरण, मंत्रजप, जपजाप मौन धारण करून करावा, असे म्हटले जाते. असे केल्याने आपण जे पूजन, आराध्याचे स्मरण करतो, त्याचे पुण्यफल, शुभफल प्राप्त होऊ शकते. तसेच गृहक्लेश कमी होऊ शकतो, अशी मान्यता आहे.
- पूर्वजांचे स्मरण: सूर्यास्तावेळी दिवेलागणीला पूर्वजांचे स्मरण अवश्य करावे, असे म्हटले जाते. घरात जर पूर्वजांचा फोटो लावला असेल, तर तिथे जाऊन मनापासून नमस्कार करावा, पूर्वजांचे स्मरण करावे. चांगल्या आठवणींना मनात उजाळा द्यावा, एक दिवा लावून पूर्वजांना अर्पण करावा. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन त्यांची कृपादृष्टी लाभू शकते, असे सांगितले जाते.
- झोपू नये: तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी झोपू नये, असे सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कृतीतून, आचरणातून, कर्मातून वृद्धीला जात असते. जर या कालावधीत झोपले तर त्या व्यक्तीचे भाग्यही झोपते, भाग्याचे पाठबळ राहत नाही, नशिबाची साथ सुटू शकते, असे सांगितले जाते. जर एखादी व्यक्ती आजारी असेल, परंतु थोडावेळ उठून बसणे शक्य असेल, तर या कालावधीत नुसते बसून आणि शक्य असेल तर आराध्याचे मनातल्या मनात स्मरण करावे, असे सांगितले जाते.